कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते गावाजवळ एक कंटेनर रस्त्यालगत उलटला आहे. या रस्त्यावर वाहन कोंडी झाली आहे. दुपारच्या वेळेत वाहनांची संख्या कमी असल्याने कंटेनर उलटल्याचा प्रभाव वाहनांवर झाला नाही. मात्र, संध्याकाळी वाहनांची संख्या वाढल्याने या रस्त्यावरील अभूतपूर्व कोंडी झाली.

रायते गावाजवळ बुधवारी (३० मार्च) पहाटे एक अवजड कंटेनर रस्त्याच्या बाजुला पडला आहे. दिवसभरात वाहने या उलटलेल्या कंटेनरला वळसा घालून येजा करत होती. कंटेनर एका बाजुला घेण्याचे काम यावेळी सुरू होते. संध्याकाळच्या वेळेत कल्याणहून टिटवाळा, मुरबाड, नगर, किन्हवली परिसरात जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. सकाळी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात जुन्नर, नगर, आंबेगाव भागातून भाजीपाला, दूध पुरवठा वाहने संध्याकाळी परतीच्या मार्गावर असतात. त्याचवेळी मुरबाडकडून अनेक वाहने कल्याण दिशेने येतात. २४ तास वर्दळ असलेला हा महामार्ग संध्याकाळी कंटेनर उलटल्याच्या ठिकाणी कोंडीत अडकला.

पहाटे कंटेनर उलटूनही वाहतूक विभाग, पोलिसांनी वाहन हटविण्याचे कोणतेच प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून केला जात आहे. मुरबाड, किन्हवली परिसरातील अनेक नोकरदार कल्याणहून रेल्वे मार्गाने मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबई भागात नोकरीसाठी जातात. परतीच्या प्रवासात चाकरमानी रायते गावाजवळ कोंडीत अडकले.

हेही वाचा : डोंबिवलीतील सुभाष रस्ता वाहतुकीसाठी दोन दिवस बंद

ही कोंडी सोडविण्यासाठी रायते गाव परिसरातील तरूण मुले रस्त्यावर येऊन वाहतुकीचे नियोजन करत आहेत. कंटेनरची डोकेदुखी असतानाच या रस्त्यावर रायते गाव परिसरात अहमदनगर-कल्याण बसचा टायर पंक्चर झाला. ही बस रस्त्यावर थांबविण्यात आली. ती वाहक, चालक, ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजुला घेण्यात आली. टिटवाळा पोलीस, स्थानिक वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.