लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील काटई ते बदलापूर रस्त्यावर १०० ते २०० मीटर अंतरावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक, काही ठिकाणी डांबराचे २० फुटाचे पट्टे आहेत. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे पेव्हर ब्लाॅकचे टप्पे अनेक ठिकाणी निघाले आहेत. डांबर असलेल्या भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे काटई-बदलापूर रस्त्यांवरुन प्रवास करताना प्रवाशांना खड्डे, खोळंबाचा सामना करावा लागत आहे.
भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक नोकरदार, व्यावसायिक अंबरनाथ, कर्जत, बदलापूर परिसरात आपल्या खासगी वाहनाने, सार्वजनिक वाहनाने येजा करतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुरबाड, पुणे, कर्जत परिसरातून अनेक अवजड वाहने या रस्त्यावरुन येजा करतात. ही वाहने खड्डे, तुटलेल्या पेव्हर ब्लाॅकमुळे संथगतीने धावतात. या अवजड वाहनांच्या मागे ती वेग घेत नाहीत, तोपर्यंत अवजड वाहनांच्या मागे रांगा लागलेल्या असतात, असे प्रवाशांनी सांगितले.
हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या इसमाला अटक
बदलापूर परिसरात गेल्यावर डी मार्ट भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे प़डले आहेत. या खड्ड्यांवर अनेक दिवसांपासून खडी, माती, काँक्रीट टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे खड्डयांचे आकार मोठे होत गेले आहेत. या खड्ड्यांमधून प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. बदलापूर डी मार्ट परिसरात दररोज सकाळ, संध्याकाळ खड्ड्यांमुळे अर्धा ते पाऊण तास कोंडीत अडकावे लागते, असे डोंबिवलीतील प्रवासी दीपक आरेकर यांनी सांगितले.
हेही वाचा… मुंबईत शिंदेच्या सेनेने दिला राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का
बदलापूर, कर्जत भागात काम करणारा कल्याण, डोंबिवली परिसरातील नोकरदार भाड्याचे वाहन भागीदारी पध्दतीने करुन दररोज या रस्त्यावरुन झटपट प्रवास म्हणून येजा करतात. त्यांनाही दररोज खड्ड्यांमुळे कार्यालयात उशिरा पोहचावे लागते. काटई-बदलापूर रस्त्याची अनेक ठिकाणी बांधणी सुस्थितीत आहे. परंतु, या रस्त्याच्या २०० मीटर अंतरावर सेवा वाहिन्या किंवा अत्यावश्यक सुविधेसाठी ठेकेदाराने १५ फूट अंतरावर पेव्हर ब्लाॅक काही ठिकाणी डांबराचे पट्टे तयार केले आहेत. या पट्ट्यांची निगा राखली जात नाही. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक निघाले आहेत. डांबर भागात खड्डे पडले आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. बदलापूर डी मार्ट भागातील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.