अंबरनाथ : काटई कर्जत राज्यमार्गावर मंगळवारी सकाळी अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेवाळी ते खोणी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी समांतर कच्च्या रस्त्यावर वाहने टाकली. परिणामी समांतर कच्चा रस्ताही वाहनांनी भरला होता. कोंडीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र यामुळे दुचाकी, बसने कार्यालय गाठणारे नोकरदार आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनचालक यांना मोठा वेळ लागत होता.

हे ही वाचा… ठाण्यात उद्यापासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला सुरूवात

हे ही वाचा… पाटलांचा बैलगाडा, बदलापुरात होतोय राडा, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून आमदार, माजी नगराध्यक्ष भिडले

काटई कर्जत राज्यमार्गावर नेवाळी ते खोणी दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. परिणामी विविध ठिकाणी मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे विविध वळणावर वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे या रस्त्यावर सातत्याने कोंडी होत असते. त्यातच एखादे वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास या कोंडीत भर पडते. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेवाळी ते खोणी दरम्यान अशीच अभूतपूर्व कोंडी झाली. नेवाळी चौकापासून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या. या रांगा दोन किलोमीटर पर्यंत पसरल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत गाड्या नेल्या. परिणामी खोणीकडून येणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली. अनेक वाहनचालकांनी शेजारी असलेल्या समांतर कच्च्या रस्त्यावर वाहने टाकली. मात्र तिकडेही वाहन चालकांच्या रांगा लागल्याने तिकडेही कोंडी झाली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना सुद्धा त्रास जाणवला. यामुळे सकाळच्या सुमारास ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि मुंबईकडे कार्यालयात जाणारे नोकरदार, प्रवासी अडकून पडले. तर परिवहन सेवेच्या बस वाहनांना सुद्धा याचा फटका बसला. सुमारे दीड तास ही कोंडी झाली होती. तासाभराने वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आले. मात्र वाहनांची संख्या आणि हातघाईवर आलेल्या वाहन चालकांमुळे कोंडी सोडवण्यात यश येत नव्हते. परिणामी कोंडी वाढतच होती.

Story img Loader