ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील खड्डय़ांमुळे सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचे चित्र होते. या महामार्गावर भिवंडीतील सोनाळे गाव ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी घरी परतणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत घरी तसेच कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.
मुंबई- नाशिक महामार्गावरील मानकोली, दिवे अंजूर, भिवंडी बायपास भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून सलग दुसऱ्या दिवशी भिवंडी येथील सोनाळे गाव ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमध्ये अनेक बसगाडय़ा, जड वाहने, मोटारी अडकून होत्या. दुचाकी चालकांचेही हाल झाले. चालकांना अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण ते एक तास लागत होता. कल्याण, भिवंडी भागातून अनेक नोकरदार मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करत असतात. सायंकाळी मुंबईहून परतत असताना वाहतूक कोंडीमुळे अनेकांना घरी वेळेत पोहचता आले नाही. महिला प्रवाशांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसला.
शीव-पनवेल महामार्गाला खड्डय़ांचा फटका
शीव-पनवेल महामार्गावर बेलापूर येथील उड्डाणपुलावर पडलेल्या प्रचंड खड्डय़ांमुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बेलापूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर उरण फाटय़ाजवळ वाहनांच्या रांगा लागतात. यासाठी हलक्या वाहनांना पामबीच मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
अहमदाबाद महामार्गावरही कोंडी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साचणारे पाणी व पडलेले खड्डे यामुळे वर्सोवा पूल ते मालजीपाडा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने तासन्तास वाहने यात अडकून प्रवाशांचे हाल झाले.