खारेगाव टोलनाका येथे खड्डे बुजविण्याच्या कामामुळे बुधवारी सकाळी त्याचा फटका ठाणे शहरातील वाहतूकीवर बसला. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खारेगाव टोलनाका ते कौसा जवळील किस्मत काॅलनी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कल्याण, शिळफाटा येथून मुंबई, ठाणेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत. वाहन चालकांना पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे २० मिनीटे लागत आहेत.
खारेगाव टोलनाका येथे खड्डे बुजविण्याचे काम मध्यरात्री सुरू होते. त्यामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून येणारी वाहतुक रोखून धरण्यात आली होती. बुधवारी पहाटे चार वाजता हे काम पूर्ण झाले. अवजड वाहनांना सकाळच्या वेळेत बंदी आहे. त्यामुळे या मार्गावर खारेगाव ते कौसा येथील किस्मत काॅलनी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कल्याण, नवी मुंबई येथून शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्गे ठाणे, मुंबई येथे वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत.
घोडबंदर मार्गावरही रात्री सुरू असलेले मेट्रोचे काम आणि सकाळच्या वेळेत एक शाळेची बस बंद पडल्याने आनंदनगर ते ओवळा पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना वेळेत कामावर पोहचता आले नाही.