ठाणे: ठाणे, नवी मुंबई येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शिळफाटा मार्गावर सोमवारी रात्री पावसामुळे झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता. शिळफाटा महापे रोड मार्ग ठप्प होता. त्यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.
शिळफाटा मार्गावरून अनेक वाहनचालक ठाणे, नवी मुंबई येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतूक करत असतात. सोमवारी रात्री या मार्गावर वाहनांचा भार वाढल्याने तसेच पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाले होती. शिळफाटा मुंब्रा मार्गावर मुंब्रा येथील वाय जंक्शन ते पडलेगाव पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर शिळफाटा महापे रोड या मार्गावर एचपी पेट्रोल पंप ते एमआयडीसी जलवाहिनी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहतूक करत होते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. वाहन चालकांना अवघ्या १० मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे रात्रीच्या वेळेस ठाणे नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण, बदलापूरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.