ठाणे: जागतिक आर्थिक केंद्राच्या उभारणीत महत्त्वाचा भाग असलेल्या ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागातील महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे पडल्याचे चित्र आहे. या खड्ड्यांमुळे संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाहतुकीचा खेळ खंडोबा झाल्याचे चित्र आहे. अवघ्या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते नऊ तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच काहीशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

बदलापूर – कल्याण – अहमदाबाद महामार्ग

मुंबई महानगर क्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या बदलापूर शहरातून मुंबई आग्रा महामार्गाद्वारे नाशिक किंवा मुंबई अहमदाबाद सुवर्ण चतुष्कोण मार्गावरून गुजरात राज्यात प्रवास केला असता येथे नियमित लागणाऱ्या वेळेपेक्षा दुप्पट आणि तिप्पट वेळ लागतो आहे. कल्याणहून भिवंडी मार्गे राजनोली ते चिंचोटी फाटा या मार्गे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोहोचता येते. बदलापूर पासून ५० तर कल्याण शहरापासून अवघे ३६ किलोमीटर असलेल्या या चौकापर्यंत पोहोचण्यासाठी बदलापूरहून अडीच तर कल्याण होऊन पावणे दोन तास लागतात. हा मार्ग टाळून बदलापूरहून भिवंडी पारोळ रस्त्यामार्गे वज्रेश्वरी रस्त्यापर्यंत पोहोचून तिथून मुंबई अहमदाबाद महामार्ग गाठण्यासाठी अडीच तास लागतात. हे अंतर अवघे ५६ किलोमीटर इतके आहे. अहमदाबाद महामार्गावर पोहोचण्यासाठी असलेले हे महत्त्वाचे पर्याय रस्ते सध्या खड्ड्यात गेले आहेत. दोन्ही मार्गांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. मात्र पर्याय नसल्याने वाहनचालक याच मार्गाने प्रवास करतात. तिसरा पर्याय ठाणे घोडबंदरमार्गे महामार्ग गाठणे हा आहे. मात्र घोडबंदर मार्गावर यापूर्वीच कोंडीचे विक्रम पाहायला मिळाले आहेत. या मार्गासह त्यावरील उड्डाण पुलांवर खड्डे पडले आहेत. कापुरबावडी पुलावर तर मोठे खड्डे आहेत. याशिवाय, या मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंब्रा बाह्यव‌ळण मार्गावरही खड्डे पडले आहे.

हेही वाचा : Thane City Vidhan Sabha Constituency : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा आमदार; नवं राजकीय समीकरण कोणाच्या पथ्यावर?

मुंबई अहमदाबाद मार्गावर पोहोचल्यानंतरही महाराष्ट्र गुजरात सीमेपर्यंत रस्त्यांवरचा संघर्ष काही कमी होत नाही. गेल्या काही दिवसात झालेल्या तुफान पावसानंतर या महामार्गावरील सर्वच उड्डाणपुलाला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यातील काही खड्डे दोन ते अडीच फुटांपर्यंत खोल आहेत. त्यामुळे येथून वाहने संथगतीने वाहतूक करतात. परिणामी, उड्डाणपूलांवर मोठी वाहतूक कोंडी होते. या खड्ड्यांमध्ये अनेक अवजड वाहने बंद पडतात. काही वाहनांचे चाक नादुरुस्त होते तर काहींचा तोल गेल्याने एक्सल तुटण्यापर्यंत घटना घडल्या आहेत. या वाहनांची दुरुस्ती त्याच ठिकाणी करावी लागत असल्याने त्यामागे तासनतास कोंडी वाढते. मुंबई अहमदाबाद मार्गावर ठिकठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मार्ग बदलण्यात येतो. त्यामुळे कोंडीत भर पडते आहे. महत्त्वाचे चौक, जोड रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने तेथे वाहनांचा वेग मंदावतो. या मार्गावर वरई नाका ते मनोरपर्यंतचा जवळपास २१ किलोमीटरचा पट्टा हा कोंडीचा सगळ्यात मोठा केंद्र आहे. येथे सुमारे पाऊण ते एक तासाची वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेक वाहन चालक वरईतून अंतर्गत रस्त्याने सफाळे रस्त्यावरून दहागाव – धुकटन मार्गे पालघर मनोर रस्त्यापर्यंत पोहोचतात. या रस्त्यावर वैतरणा नदीवर बहाडोली येथे एकच कार जाईल असा पूल आहे. अनेकदा अतिउत्साहामध्ये सिग्नल मोडून वाहन चालक या पुलावर चढतात. समोरून येणाऱ्या वाहनामुळे येथे वाद होतात. एका वाहन चालकाला वाहन मागे घ्यावे लागते. यात सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ जातो. हे दिव्य पार पडल्यानंतर पालघर मनोर रस्त्यावरून पुन्हा वाहन अहमदाबाद महामार्गावर पोहोचते. मात्र मनोर चौकात चिंचोळ्या रस्त्यामुळे महामार्ग ते अंतर्गत रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंतची वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे वाहन चालकांचा संताप होतो आहे. महामार्गावरही गेल्या काही दिवसात बंद वाहनांमुळे कोंडीत मोठी भर पडली आहे.

चारोटी – विक्रमगड – वाडा – वासिंद

मुंबई आमदाबाद मार्गावरून कल्याण, ठाणे किंवा बदलापूरच्या दिशेने प्रवास करायचा असल्यास पुन्हा हे दिव्य पार करावे लागते. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अशाच प्रकारे ठिकठिकाणी कोंडी असल्याने पर्यायी मार्गांचा वापर केल्यास त्याचीही भीषण दुरावस्था झाली आहे. चारोटी येथून विक्रमगडमार्गे वाडा आणि वासिंद येथे मुंबई आग्रा महामार्गावर यायचे असल्यास अंतर्गत रस्त्याची ही खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. तरीही अनेक वाहन चालक हा कमी कोंडीचा मार्ग स्वीकारतात. चारोटी येथून चिंचोटी किंवा ठाण्यापर्यंत येण्यासाठी सुमारे पाच तास लागत आहेत. तर या मार्गामुळे साडेचार तास लागतात. चारोटी विक्रमगड या ग्रामीण भागातील रस्त्यावर गेल्या काही दिवसात वाहतूक वाढली आहे. विक्रमगड ते वाडा या रस्त्याची ही अशीच दुरावस्था आहे. वाडा ते वासिंद या शहापूर मार्गावरील खड्ड्यांची स्थिती भयावह आहे. वाडा ते शहापूर फाटा या अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास लागतो. येथील खड्डे इतके मोठे आहेत की अनेक अवजड वाहनांचाही येथे तोल जातो. स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वाडा ते वासिंद हा प्रवासही तितकाच खडतर असून माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराळ भागातून जाणारा या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी अडीच ते तीन फुटांपर्यंतचे खड्डे आहेत.

हेही वाचा : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे

मुंबई आग्रा महामार्ग

मुंबई आग्रा महामार्गाची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून भीषण आहे. शहापूर, वासिंद, पडघा ते भिवंडी पर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पडघे इथून टिटवाळा अंबरनाथ बदलापूर असा प्रवास करणाऱ्यांसाठी असलेला मार्ग काही अंशी बरा असला तरी येथे असलेले गतिरोधक वाहतुकीचा वेग कमी करतात.

कल्याण अहमदनगर महामार्ग

कल्याण अहमदनगर महामार्गावर गोवेली येथे रस्ता खराब आहे पुढे ज्या ठिकाणी जेएनपीटी वडोदरा महामार्ग नगर महामार्गाला शिरून जातो तेथेही खड्डे पडले आहेत पुढे रायता पूल ओलांडल्यानंतर रस्ते कामामुळे वाहतूक संततीने चालते.

पूल, उड्डाणपूल खड्ड्यात

कल्याण बदलापूर राज्य मार्गावर कल्याण येथील उड्डाणपुलावर कल्याण अहमदनगर महामार्गावर शहाड येथील उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत परिणामी इथून पूल पार करताना १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो.

टोल वसुली सुरूच

मुंबई अहमदाबाद महामार्ग मुंबई आग्रा महामार्ग या मार्गांवर भीषण खड्डे पडले असून वाहन चालकांची दैना उडाली आहे असे असतानाही येथील टोल वसुली मात्र सुरूच आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नेमण्यात आलेले कंत्राटदार सरसकट वसुली करतात त्यांना जाब विचारल्यास उडवाउडवीचे उत्तर दिली जातात. आधीच कोंडीमुळे संतापलेले वाहनचालक यामुळे त्रासले आहेत.

महिलांची कुचंबणा

वाहतुकीचा वेग कमी आणि प्रवासाचा वेळ अधिक झाल्याने प्रवाशांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा होते आहे. यात महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांचा त्रास वाढला आहे.

कल्याण डोंबिवली खड्डे

कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सीमेंट काँक्रिटची कामे सुरू आहेत. यामुळे जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. या प्रकाराने नागरिक, प्रवासी हैराण आहेत. हे दुखणे कायम असताना दुसरीकडे खड्डयांचा त्रास कायम आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मोहने, अटाळी भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. डोंबिवलीतील सुभाष रस्ता, देवीचापाडा गोपीनाथ चौक ते गरीबापाचापाडा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. टिळक चौक ते फडके चौक रस्ता खड्ड्यात गेला आहे. गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. पाऊस सुरू असल्याने हे खड्डे पाण्याने भरलेले असल्याने वाहन चालकांना या खड्ड्यांमधून वाहने चालविताना कसरत करावी लागते. काँक्रिट रस्त्यांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत ठेवण्यात आली आहेत. एमआयडीसीमध्ये हे चित्र आहे.

हेही वाचा : अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

वाहनांचे टायर फुटले

मुंबई-नाशिक महामार्गा वर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एकाचवेळी सात वाहनांचे टायर फुटल्याची घटना रविवारी लाहे येथे घडली. यामुळे या महामार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पडघा ते कसारा घाट या दरम्यान मुंबई – नाशिक महामार्गावर महाकाय खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खचल्या आहेत तर गावाजवळ असलेल्या सेवा रस्त्याचीही खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर वडपाखिंड ते कसारा घाट या दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठ्या वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून त्यांचा वेळेचा अपव्यय व आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच वासिंद, आसनगाव येथे उड्डाणपूल, रेल्वेपुल व अंडरपास ची कामे सुरू असल्याने कायम वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.