ठाणे: गेल्याकाही दिवसांपासून माजिवडा, कापूरबावडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत माजिवडा पेट्रोल पंप जवळ मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारणीचे काम सुरू होणार आहे. या कामांमुळे आता माजिवडा, कापूरबावडी चौकात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच या मार्गावर होणारी कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असताना येथे मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे वाढणारी कोंडी कशी कमी करायची, असा पेच वाहतूक पोलिसांपुढे उभा राहिला आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग आणि ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरून माजिवडा मार्गे हजारो वाहने घोडबंदर, कशेळी काल्हेर आणि कोलशेतच्या दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या मार्गावर वाहनांचा मोठा भार असतो. या मार्गावर वाहतूक बदल लागू करत त्यासाठी दुभाजक बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरु आहेत. यामुळे गेल्याकाही दिवसांपासून माजिवडा, कापूरबावडी चौकात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. अनेकदा वाहनांच्या रांगा कापूरबावडी चौकापासून ते गोकुळनगर पर्यंत जातात. यामुळे अवघ्या तीन ते चार मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना २० मिनीटांचा अवधी लागतो.
हेही वाचा… भिवंडी पालिकेच्या ताफ्यात लघु अग्निरोधक वाहने दाखल
मेट्रो प्रकल्पासाठी घोडंबंदर तसेच ठाणे शहरातील महामार्गावर खांबाची उभारणी करण्यात आली आहे. तर, घोडबंदर आणि भिवंडी मेट्रोला कापुरबावडी जंक्शन येथे जोडण्यात येणार असून त्यासाठी माजिवाडा येथे मेट्रो मार्गिकेकरिता खांब उभारणीचे काम शिल्लक आहे. हे काम येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मार्गारोधक बसविण्यात येणार असून यामुळे येथील मार्ग अरुंद होणार आहे. यामुळे येथील कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजीवाडा येथील मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणीनंतर कापूरबावडी चौकाजवळील मारूती मंदिरासमोरही मेट्रो मार्गिकेचे खांब उभारले जाणार आहे. ठाणे महापालिकेने काही महिन्यांपूर्वी कापूरबावडी चौकाजवळील सिग्नल बंद केला होता.परंतु हे काम सुरू झाल्यास हा सिग्नल पुन्हा सुरू करावा लागणार आहे. तसेच उड्डाणपूलाखालून वाहतुक सुरू करावी लागणार आहे. अन्यथा वाहतुक कोंडीत आणखी वाढ होईल असे एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.