लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिली असली तरीही अनेक एक्स्प्रेसगाड्या या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांवरून धावत आहे. या रेल्वे रुळांलगत असलेल्या रहिवाशांच्या एक्स्प्रेसगाड्यांच्या आवाजामुळे कानठळ्या बसू लागल्या आहेत. वृद्ध, रुग्ण या प्रकारामुळे त्रस्त झाले असून यातून केव्हा सुटका मिळेल अशी विचारणा करू लागले आहेत. उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर ही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील रहिवाशांनी वारंवार मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्यांना सकारात्मक परिणाम दिसून येत नाही असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान दोन मार्गिकांचे लोकार्पण फेब्रुवारी २०२२ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर यातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गिकांवरून धिम्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. पूर्वीच्या अस्तित्त्वात असलेल्या रेल्वे मार्गिकांवरून जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. तर, पारसिक बोगद्यातील मार्गिका पाचवी आणि सहावी मार्गिका ओळखली जात आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिका या मालगाड्या आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध असतील असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून केला जात होता.
आणखी वाचा-बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह
परंतु पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसह तिसऱ्या- चौथ्या मार्गिकांवरूनही एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक होत आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीमुळे जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक खोळंबते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर, खारेगाव, कळवा, पारसिक भागात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. येथील रहिवासी आता या एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीने हैराण झाले आहेत. एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे येथील वृद्धांना आणि रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेतही एक्स्प्रेसगाड्यांची वाहतुक होत असते. त्यामुळे आवाजाची पातळी वाढते असे रहिवाशांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वे प्रशासनाला विचारले असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणासाठी आम्ही २०११ पासून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले होते की, उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. परंतु अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर धोरणात देखील बदल होत असल्याचे दिसून येते. एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवरून सुरूच आहे. पाचवी-सहावी मार्गिका निर्माण झाली तरीही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे सध्यातरी या मार्गिकेचा उपयोग झालेला नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक आहे. -लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ.
आणखी वाचा-Badlapur : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
ठाणे ते दिवा नवीन रेल्वे रूळ निर्माण केल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा वाढविण्या ऐवजी प्रशासनाकडून हे अतिरिक्त रेल्वे रूळ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी वापरले जात आहेत. कर्ज काढले उपनगरीय रेल्वेसाठी, परंतु या रेल्वेरूळांवर दिवसरात्र मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालविल्या जात आहेत. एमआरव्हीसीच्या माध्यमातून एमयुटीपी प्रकल्प सुरू करण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे, पृथक्करण. मेल एक्स्प्रेसचे मार्ग उपनगरीय रेल्वे पासून वेगळे करणे. हे रेल्वेने जागतिक बँकेला कर्ज काढताना लिहून दिले आहे. तरीही रेल्वेच्या बेजाबदारपणामुळे मुंबईकर प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. -सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक प्रवासी संघटना.