डोंबिवली- येथील पूर्व भागातील फडके रस्ता वाहतूक विभागाने एक दिशा मार्ग केला आहे. या रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी आहे. या रस्त्यांवरुन मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकाकडून येणारी वाहनेही सकाळ, संध्याकाळ फडके रस्त्यावरुन गणेश मंदिर दिशेने उलट मार्गिकेतून धावत असल्याने या रस्त्यावर अलीकडे सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे.
डोंबिवलीतील फडके रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने या रस्त्यावरुन रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. या रस्त्यावरुन उलट दिशेने वाहने नेण्यास वाहतूक विभागाने बंदी घातली आहे. तरीही अनेक वाहन चालक रेल्वे स्थानकाकडून, मानपाडा रस्ता बाजीप्रभू चौकातून, के. बि. विरा शाळा गल्लीमधून येऊन फडके रस्त्याने उलट मार्गिकेने गणेश मंदिर दिशेने जातात. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला फेरीवाले, पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यात उलट मार्गिकेतून चारचाकी, दुचाकी वाहने धावत असल्याने या रस्त्यावर दररोज संध्याकाळ सर्वाधिक कोंडी होते.
हेही वाचा >>>डोंबिवलीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
फडके रस्त्यावरुन डोंबिवली शहर परिसरातील गृहसंकुलातील रहिवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ठाणे, नवी मुंबई परिसरातून कामगारांना घेऊन येणाऱ्या कंपन्यांच्या बस, शाळेच्या बसची सकाळ, संध्याकाळ गर्दी असते. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षा, मोटारी, दुचाकी वाहने यांची भर या गर्दीत असते. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ फडके रस्ता वाहनांनी गजबजून गेलेला असतो. ही वाहने एक दिशा मार्गिकेतून गेल्यावर वाहन कोंडी होत नाही. अलीकडे रेल्वे स्थानकाकडून उलट मार्गिकेतून अनेक वाहन चालक या रस्त्यावर वाहतूक पोलीस आणि पोलिसांचे अडथळे नसल्याने पाहून वाहने चालवितात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत हा रस्ता सर्वाधिक कोंडीत अडकतो.
हेही वाचा >>>कसारा येथे तरुण -तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
गणपतीचे चार ते पाच दिवस खरेदीसाठी डोंबिवलीतील बाजारपेठेत गर्दी उसळणार असल्याने वाहतूक विभागाने अंबिका हाॅटेल समोरील रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ एक वाहतूक सेवक तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच अनेक वाहन चालक वर्दळीच्या फडके रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करुन ठेवतात. खरेदीसाठी रेल्वे स्थानका जवळील बाजारपेठेत जातात. त्यांचाही त्रास पादचारी, सरळ मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांना होतो. वाहतूक विभागाने उलट मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.