कल्याण : शीळफाटा रस्त्यावरील देसई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू असून या पुलावर तुळई ठेवण्याचे काम १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत दररोज केले जाणार आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक रात्रीच्या आठ तासाच्या कालावधीत बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दिवसा वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्याने या मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरणाची कामे मागील सहा वर्षांपासून सुरू आहेत. या रस्त्यावरील लोढा पलावा चौका जवळील देसई खाडी जुन्या पुलाजवळ नवीन पूल उभारणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचे खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावर तुळई ठेवण्याचे काम महामंडळाकडून हाती घेण्यात येणार आहे.

शिळफाटा रस्त्यावर सकाळच्या वेळेत मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे तुळई ठेवण्याच्या कामासाठी दिवसा वाहतूक बदल लागू केले तर या मार्गासह पर्यायी मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ शकते.  ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत महामंडळाला देसई पुलावर तुळई ठेवण्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. १५ डिसेंबर, गुरुवार रात्री ११ वाजल्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. पुढील गुरुवापर्यंत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत हे काम केले जाणार आहे. या कामात अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक विभागाने शिळफाटा रस्ता आठ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेऊन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविली आहे. या मार्गावरून दररोज रात्रीच्या वेळेत अवजड तसेच इतर वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. याशिवाय, दुपार व रात्री काम करणारा नोकरदार वर्गही याच मार्गे रात्रीच्या वेळेत प्रवास करतो. ही वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविल्याने या मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic on shilpata route closed at night on the road transportation ysh