डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील सर्वाधिक वर्दळीच्या पलावा चौकातील उड्डाण पुलाच्या आधार खांबावर तुळई ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. हे काम येत्या बुधवार ते सोमवार या कालावधीत रात्री १० ते सकाळी सहा वेळेत करण्यात येणार आहे. या सहा दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन केले आहे, असे कल्याणमधील कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
पलावा चौकातील उड्डाण पुलावर तुळई ठेवण्याचे काम करण्यासाठी येत्या बुधवार ते सोमवार रात्रीच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याच्या कामासाठी सहकार्य करण्याची मागणी एमएसआरडीसीने वाहतूक विभागाकडे केली आहे. पलावा चौकातील उड्डाण पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण होणे आवश्यक असल्याने तातडीने तुळई ठेवण्याच्या कामासाठी महामंडळाला शिळफाटा रस्ता वाहतूक बंद ठेवण्याच्या कामासाठी सहकार्य करण्याचे नियोजन वाहतूक विभागाने केले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले. महामंडळाने देसई खाडी पूल ते पलावा चौक दरम्यान वाहने बंद करण्याची मागणी केली आहे. या पूल आणि चौकाच्या दरम्यान सेवा रस्ते किंवा पर्यायी पोहच रस्ते नाहीत. येत्या बुधवारी ते सोमवार या कालावधीत रात्री १० ते सकाळी सहा वेळेत शिळफाटाकडून कल्याण, डोंबिवली रस्त्याकडे येणारी सर्व प्रकारची जड, अवजड, हलकी वाहने उत्तरशीव, तळोजामार्गे सोडण्यात येणार आहेत. काही वाहने मुंब्रा बाह्यवळण रस्त्याने कळवा, नाशिक महामार्ग, भिवंडी दिशेने जातील. नाशिक, कल्याण, डोंबिवलीतून येणारी वाहने भिवंडी बाह्यवळण रस्ता, कळवा, मुंब्रा मार्गे किंवा काटई नाका येथून बदलापूर पाईपलाईन रस्त्याने खोणी तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा – डोंबिवलीत दोन महिने उच्छाद घालणारं माकड जेरबंद, वनविभागाची कारवाई
रात्रीच्या वेळेत हलक्या वाहनांचे प्रमाण कमी असते. नोकरदार वर्गाच्या वाहनांची वर्दळ रात्री नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर असते. त्यामुळे सहा दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर रात्रीच्या वेळेत पलावा चौकातील कामासाठी रस्ते बंदचा निर्णय घेतला तरी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार नाही. तरीही रात्रीच्या वेळेत सहा दिवसांच्या कालावाधीत वाहतूक पोलीस शिळफाटा रस्त्यावरील सर्व वळण रस्त्यांवर तैनात असतील.
पलावा चौकातील पुलाचे पाया आणि खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावर एक तुळई ठेवण्याचे काम शक्तिमान क्रेनच्या साहाय्याने केले जाणार आहे. या कालावधीत वाहनांचा अडथळा म्हणून महामंडळाचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी वाहतूक विभागाने रस्ते बंदसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.