ठाणे : माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे माजिवडा पुलावरून मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून ही वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ यावेळेत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. यामुळे ठाणे, घोडबंदर मार्गावर पुढील पंधरा दिवस वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तसेच घोडबंदर असे दोन महामार्ग जातात. हे दोन्ही महामार्ग माजिवडा भागात एकमेकांना जोडण्यात आलेले असून या ठिकणी माजिवडा उड्डाण पुल आहे. या पुलाशेजारीच माजिवडा मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या स्थानकावर छत उभारण्यासाठी खांब उभारण्यात आलेले आहेत. तसेच त्यावर जॅक बीम टाकण्यात येणार असून यानंतर राफ्टर उभारण्यात येणार आहे. हे काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या सहाय्याने केले जाणार आहे.
५ एप्रिलपासून हे काम सुरू झालेले असून ते २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या मार्गावरील वाहतूकीत मोठे बदल लागू केले आहेत.
वाहतूक बदल का ?
माजिवडा मेट्रो स्थानकाचे छत उभारणीचे काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ही क्रेन माजिवडा उड्डाण पुलावरील मुख्यवाहीनीवर ज्युपीटर रुग्णालयासमोरील पुलाच्या चढणीवर उभी करावी लागणार आहे. यामुळे माजिवडा उड्डाणपुलावर मुंबईहून नाशिक, घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी येथे वाहतूक बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल मुंबईकडून माजिवडा उड्डाण पुलावरून ज्युपीटर रुग्णालय वाय जंक्शन मार्गे घोडबंदरकडे अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना विवियाना मॉल समोरील पुलावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर रुग्णालय समोरील रस्त्याने पुढे सरळ जावून कापूरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबईकडून माजिवडा उड्डाण पुलावरून ज्युपीटर रुग्णालय वाय जंक्शन मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना विवियाना मॉल समोरील पुलावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर रुग्णालय समोरील रस्त्याने पुढे सरळ जावून गोल्डन कॉस मार्गे इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.