ठाणे : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान रॅली’ मुंबईच्या वेशीवर आली आहे. या मोर्चाला मुलुंड टोलनाका येथे पोलिसांनी अडविले. परंतु या रॅलीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रात्री कामाहून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
रामगिरी महाराज आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानांचा निषेध करत जलील यांनी या मोर्चाची हाक दिली होती. छत्रपती संभाजीनगरासह राज्याच्या विविध भागांतून बस, मोटारी आणि दुचाकींवरून पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री मुंबई-नाशिक महामार्गावरून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने गेला. परंतु यामुळे मुलुंड टोलनाका, माजिवडा, खारेगाव टोलनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघ्या पाच ते १० मिनीटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत होता. मुलुंड टोलनाका येथे मुंबई पोलिसांनी मोर्चा अडविला. मात्र रात्री उशीरापर्यंत महामार्गावरील वाहनांच्या रांगा कायम होत्या.