ठाणे : मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या कोपरी रेल्वे उड्डाणपलावर लोखंडी तुळई (गर्डर) उभारणीचे काम शनिवार ते सोमवारपर्यंत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत केले जाणार आहे. याकालावधीत मोठ्या क्रेन कोपरी पूलाजवळ उभ्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत कोपरी पूल येथील अतिरिक्त मार्गाच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद असणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम मध्यरात्री आणि सकाळच्या वेळेत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो जड-अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. या महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपूल हा अरुंद असल्याने त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. अनेक महिन्यांची मुदत उलटूनही या कोपरी पूलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या या पूलावर अतिरिक्त मार्गिका तयार केल्या असून मुख्य पूलावर येत्या शनिवार ते सोमवार या दिवशी दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत तुळई उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त मार्गिका बंद करावी लागणार असून वाहतूक पोलिसांनी या मार्गिकेवर वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्र्यांनी हातातले खंजीर बाजूला ठेवावेत’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले “वसा, वारसा…”

असे आहेत वाहतूक बदल
ठाण्याहून मुबंईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड – अवजड वाहनांसाठी
१) नाशिक मुंबई महामार्गाने कोपरी पूलावारून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे रबाळे – ऐरोली, मुंबई पुर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
२) घोडबंदर मार्गाने कोपरी पूलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड- अवजड वाहनांना माजीवाडा पूलावरून उजवे वळण घेण्यास व माजीवडा पूलाखाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा पूलावरुन खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेवून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे रबाळे – ऐरोली, मुंबई पुर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा : ठाणे: भूविकास बँकेच्या कर्ज बोजाखाली दबललेल्या अडीच हजार शेतकऱ्यांची मुक्तता

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी
१) नाशिक तसेच घोडबंदर मार्गाने आणि ठाणे शहरातून पूर्व द्रुतगतीमार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांना तीनहात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – शहरातील वाहने टपाल कार्यालय, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा-विटावा- ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग – घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तिन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवुन एल. बी. एस. मार्गे, मॉडेला चेक नाका येथून इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग – घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तिन हात नाका, तुळजा भवानी मंदिर सेवा रस्ता, बारा बंगला, बाल निकेतन शाळा, आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईत जातील. मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कोपरी पूलावरून प्रवेशबंदी आहे.

जड अवजड वाहनांसाठी
१) मुंबई पुर्वद्रुतगती महामार्गाने ठाणे शहराकडे येणारी जड अवजड वाहने ही ऐरोली पूल, नवी मुंबई मार्गे इच्छित स्थळी जातील.
हलक्या वाहनांसाठी
पर्यायी मार्ग १) मुंबई पुर्वद्रुतगती महामार्गाने ठाणे शहराकडे येणारी हलकी वाहने कोपरकर चौक, सोन चौक येथून उजवीकडे वळन घेऊन एल. बी. एस. मॉडेला चौक, तिन हात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २) नवघर रोड,नवघर चौक, कॅम्पास उपाहारगृह, पूर्व-पश्चिम पूल येथून ए.सी.सी. सिमेंट मार्ग, महाराणा प्रताप चौक, एल.बी.एस. मॉडेला नाका, तिन हात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग ३) मुलुंड टोलनाका येथून निलम नाका, अग्निशमन केंद्र, ए.सी.सी. सिमेंट मार्गे, महाराणा प्रताप चौक, एल.बी.एस. मॉडेला चेक नाका, तिन हात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic on the kopari bridge is completely closed from saturday to monday midnight