कल्याण : डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर येथील उल्हास खाडीवर नव्याने बांधण्यात आलेल्या माणकोली उड्डाण पुलावरून धावणाऱ्या वाहनांमुळे डोंबिवलीतील वाहन संख्या वाढू लागल्याने वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. येत्या काळात माणकोली पुलावरून हलक्या वाहनांसह अवजड वाहने धाऊ लागली तर ही कोंडी वाढू शकते. हा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता विभागाने डोंबिवली शहर परिसरासाठी वाहतूक सुसुत्रतेचा आराखडा तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून शहर अभियंता अनिता परदेशी, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी या आराखड्याची रचना केली आहे. माणकोली पुलाचे शासनाकडून अधिकृतपणे उद्घाटन झाले नाही. या पुलाची डोंबिवली बाजूकडील अनेक कामे, रेतीबंदर रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल उभारणे बाकी आहे.

आणखी वाचा-महिनाभरात २१ नवजात बालकांचा मृत्यू; बालकांचे वजन कमी असल्याचा कळवा रुग्णालय प्रशासनाचा दावा

डोंबिवलीतून मुंबई, ठाणे येथे जाण्यासाठी माणकोली पूल कमी कालावधीचा मधला मार्ग असल्याने प्रवासी माणकोली पुलावरून जाण्यास पसंती देत आहेत. डोंबिवलीत एवढी वाहन संख्या सामावून घेण्याची क्षमता नसल्याने डोंबिवलीत वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. माणकोली पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर डोंबिवलीतून वाहन चालविणे अवघड होणार आहे. त्यामुळे शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून डोंबिवलीसाठी वाहतूक सुससुत्रतेचा एका आराखडा तयार केला आहे.

कसा आहे आराखडा

या आराखड्याप्रमाणे डोंबिवलीत पश्चिमेत देवीचापाडा सातपूल भागात दिवा-वसई रेल्वे मार्गाखालून दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे टिटवाळा ते मोठागाव-काटई वर्तुळकार १८ मीटर रूंदीच्या रस्त्यावर देवीचापाडा भागात असणार आहेत. हे बोगदे माणकोली पूल येथे डावे वळण घेऊन गणेशनगर, ठाकुर्ली, पत्रीपूलकडे धावणाऱ्या वाहनांसाठी सोयीस्कर आहेत. पत्रीपुलाकडून खंबाळपाडा, गणेशनगर, देवीचापाडा, मोठागावमार्गे माणकोली पुलाकडे या रस्त्याने वाहने डोंबिवलीतून न येता शहराबाहेरून येऊ शकतात, असे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू

माणकोली पुलावरून उजवे वळण घेतल्यानंतर वाहने मोठागाव स्मशानभूी येथील १५ मीटरच्या पोहच रस्त्याने रेतीबंदर रेल्वे फाटकाकडे येणार आहेत. रेतीबंदर रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम रेल्वेकडून सुरू झाल्यानंतर या भागातील रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत माणकोली पुलावरून डोंबिवलीत येणारी वाहने जुनी डोंबिवली, कोपर येथील बोगद्यांमधून धावतील. या वाहनांंना अडथळा नको म्हणून कोपर, जुनी डोंबिवलीतील काही रस्ते रूंदीकरणाचा विचार प्रशासन करत आहे.

रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल उभारून पूर्ण झाला की माणकोली पुलावर वाहने कोपर, जुनी डोंबिवली बोगदे, देवीचापाडा येथील दोन बोगदे आणि रेल्वे फाटकावरील पुलावरून अशा वेगळ्या पाच मार्गिकांमधून धावणार आहेत. वाहने वेगळ्या रस्त्याने धावणार असल्याने शहरात वाहन कोंडी होणार नाही, असे शहर अभियंता परदेशी यांनी सांगितले.

मोठागाव माणकोली येथील उड्डाण पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर डोंबिवलीत वाहन कोंडी होऊ नये म्हणून सविस्तर वाहन सुसुत्रता आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे डोंबिवलीत वाहन कोंडी होणार नाही असे नियोजन केले आहे. -अनिता परदेशी, शहर अभियंता

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic plan of kalyan dombivli municipality to solve the traffic coming from mankoli bridge to dombivli mrj