जवाहरलाल नेहरू बंदराच्या दिशेने दररोज शेकडोंच्या संख्येने ये-जा करणारी अवजड वाहने..मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याची झालेली दुरवस्था, मुंबई-नाशिक महामार्ग तसेच सर्व प्रमुख रस्त्यांची पावसामुळे झालेली चाळण आणि त्यामुळे जागोजागी होणारी वाहनांची कोंडी सोडवायची तरी कशी, असा पेच ठाण्याच्या वाहतूक पोलिसांना पडला असून ‘खड्डे बुजवा अन्यथा कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास तुम्ही जबाबदार असाल’ असे निर्वाणीचा इशारा पोलिसांनी वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ तसेच ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने गुरुवारी अवजड वाहनांची वाहतूक मंदावली आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. गेल्या काही महिन्यांपासून जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या गोदामांच्या दिशेने ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या २५ टक्क्यांनी वाढल्याचा वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळयामुळे ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर वाहतूक सेवक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. महामार्गासह सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठाले खड्डे पडल्याने जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने नादुरुस्त होऊ लागली असून त्यामुळे कोंडीत मोठी भर पडू लागली आहे. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावरील टोलनाका हटविल्यानंतर या रस्त्याला सध्या कुणीच वाली नाही, असे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून काही ठिकाणी हा रस्ता धोकादायक बनला आहे. शीळ-मुंब्रा पर्यतचा रस्ताही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याला काही ठिकाणी कॉक्रिटचे पदर टाकण्यात आले असले तरी त्यांनाही मोठय़ा भेगा पडल्या आहे. शीळ-डोंबिवली रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. खारेगाव टोलनाका ते माणकोलीपर्यंतचा काही भाग आयआरबी कंपनीच्या अखत्यारित येतो, तर काही पट्टा रस्ते विकास महामंडळाकडे आहे. गुरुवारच्या कोंडीनंतर या सर्व यंत्रणांना ठाणे वाहतूक पोलिसांनी खरमरीत पत्र लिहीले असून तातडीने खड्डे बुजवा, अशी विनंती केली आहे.
वाहतूक कोंडीमुळे कायदा-सुव्यवस्थेचे चित्र निर्माण झाल्यास आपण जबाबदार असाल असा इशारा या विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आला आहे. – डॉ.रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, ठाणे</strong>