डोंबिवली : डोंबिवली येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौकात नियमित सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार रिक्षा चालक मालक संघटनेने वाहतूक विभागाकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेत डोंबिवली वाहतूक विभागाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी सहा नंतर गणेश चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यास सुरुवात केल्याने या चौकातील वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळाला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौकात वाहन कोंडी होत होती. काही बेशिस्त रिक्षा चालक पुढे जाण्याच्या शर्यतीत हेतुपुरस्सर चौकामध्ये रिक्षा मध्ये घुसवून वाहन कोंडी करत होते. यामध्ये भाड्याने रिक्षा घेऊन चालविणाऱ्या शाळकरी मुलांचा सर्वाधिक सहभाग होता. ही मुले कोणाचेही काही ऐकत नसल्याने दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणेश चौकात कोंडी होत होती. स्थानिक कार्यकर्ते ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला यश येत नव्हते.
ही कोंडी सोडविण्याची मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी डोंबिवली वाहतूक विभागाकडे केली होती. या विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ चव्हाण, हवालदार गणेश कोळी, महेश राऊत, वाहतूक सेवक दिनकर सोमासे, केशव बदर यांचे कायमस्वरुपी एक पथक तयार केले. हे पथक मागील दोन दिवसांपासून गणेश चौक, फुले रस्त्यावरील माॅनजिनिज चौकात तैनात केले आहे. या चौकांमध्ये कोपऱ्यावर वाहने उभी करुन कोंडीत भर घालणारे वाहन चालक या भागातून गायब झाले आहेत.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये तीन तासात दोन महिलांची मंगळसूत्र लांबवली
गणेश चौकात बाजारपेठ परिसर असल्याने अनेक ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जात होती. या वाहनांचा रहदारीला अडथळा येत होता. अनेक महिन्यानंतर गणेश चौकातील कोंडी सुटल्याने कामावरुन घरी परतणारे प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. सकाळी आठ ते सकाळी ११, संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलीस या चौकात तैनात असतात.