बदलापूर: बदलापूर शहरातील स्थानक परिसर कोंडीत सापडला आहे. बेकायदा पार्किंग, रस्त्याच्या दुतर्फा असलेले विविध थांबे यांवर वाहतूक पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. ही कोंडी कायम असताना या कोंडीकडे लक्ष देण्याऐवजी वाहतूक पोलिसानी अंतर्गत रस्त्यांवर वाहन तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे सकाळी रेल्वे स्थानकात लोकल पकडण्याची घाई असताना वाहतूक पोलीस या पहाऱ्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत दोन मोटार कार चालकांकडून डिझेलची चोरी
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंचा परिसर कोंडीत अडकला आहे. विशेषत बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या बदलापूर पश्चिम भागातील रस्त्यावर मोठी कोंडी होत असते. या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा पद्धतीने वाहने उभी केली जातात. रस्ताच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारची रिक्षा, जीप थांबे आहेत. तर स्थानकापासून अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंगचे पेव फुटले आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदा पद्धतीने उभ्या असलेल्या या वाहनांमुळे पादचारी, इतर वाहने, दुकानदार यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत असते. मात्र विविध कारणे दाखवत वाहतूक पोलिसांकडून या कारवाईस टाळाटाळ केली जाते. स्थानक परिसरातील वाहन कोंडीवर उपाय करण्यातही या पोलिसांकडून कानाडोळा केला जातो. त्यामुळे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कायम आहे. असे असताना आता वाहतूक पोलिसांकडून शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर वाहन तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी स्थानक ते मांजर्ली या अतंर्गत रस्त्यांवर मांजर्ली स्मशानभूमीशेजारी असलेल्या नाल्याजवळ शुक्रवारी वाहतूक पोलीस सापळा रचून होते. सकाळच्या वेळी या वाहतूक पोलिसांकडून रिक्षा, दुचाकींना थांबवून तपासणी केली जात होती. विशेष म्हणजे एकीकडे सकाळच्या सुमारास चाकरमानी वालिवली, एरंजाड, मांजर्ली या भागातून चाकरमानी लोकल पकडण्यासाठी घाईत असतात. त्याचवेळी वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या या तपासणीवर संताप व्यक्त होत होता. अनेक रिक्षाचालकांना थांबवले जात होते. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या लोकल चुकल्या.
हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
आधी कोंडी सोडवा
बदलापूर पश्चिम स्थानक परिसरात ज्या अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलीस तपासणी करतात त्याच रस्त्यावर मोठ्या संख्येने दुचाकी बेकायदा पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यावर कधीही कारवाई झाली नाही. तर बस स्थानकाशेजारी असलेल्या पोलीस चौकीच्या मागेच बस स्थानकाच्या जागेत अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र त्यांच्यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आधी ते कर्तव्य बजावा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी देत होते.