लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली शहरातील वाहन चालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेने शहराच्या विविध भागात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे. यापुढे चौक, रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसला तरी ते कर्तव्य यापुढे सीसीटीव्ही पार पाडणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमाचा भंग न करता वाहने चालवावीत, असे आवाहन येथील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.
डोंबिवली शहरातील वाहन संख्या वाढली आहे. चौका-चौकांमध्ये वाहन नियोजनासाठी वाहतूक विभागाला उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस, सेवक नेमणे शक्य होत नाही. त्याचा गैरफायदा काही बेशिस्त रिक्षा, मोटार, दुचाकी, अवजड वाहन चालक घेतात. डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या प्रवेशव्दारावर प्रवासी वाहतूक करण्यास बंदी आहे. तरी काही रिक्षा वाहतूक पोलिसांची नजर चुकवून चालक रस्ता अडवून वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करतात.
काही वाहन चालक एक दिशा मार्गिका असुन तेथून उलट दिशेने वाहने नेतात. काही अवजड वाहन चालक अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना तेथून वाहन नेतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर आता पालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.
हेही वाचा… ठाणे: भीषण अपघातात रिक्षाचालक जखमी
वाहतूक नियमभंग करताना जे वाहन चालक सीसीटीव्हीमध्ये कैद होतील. अशा सर्व वाहन चालकांची माहिती वाहतू विभाग संकलित करील. संबंधित वाहन चालकाला ऑनलाईन पध्दतीने ई चलान पध्दतीने नियमभंगाप्रमाणे दंडाची रक्कम पाठविली जाईल. वाहन चालकाने नियमभंग केल्यानंतर सीसीटीव्ही तो प्रकार कॅमेऱ्यात कैद करुन ती माहिती नियंत्रण कक्षाला देईल. तेथून तात्काळ वाहतूक नियमभंगाची नोटीस वाहन चालकाला जाईल असेही नियोजन पालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रत्येक चौक, रस्त्यावर वाहतूक पोलीस नसला तरी सीसीटीव्ही ती जबाबदारी २४ तास पार पाडणार आहे, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले. या योजनेमुळे वर्दळीचे रस्ते, चौक भागात वाहतूक पोलीस तैनात करणे शक्य होईल. इतर भागातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल, असे गित्ते यांनी सांगितले.
“प्रत्येक चौक, रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसला तरी ती जबाबदारी यापुढे पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेऱे पार पाडणार आहेत. नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाईन माध्यमातून दंड चलन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन येजा करताना प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक शिस्तीचे पालन करुन वाहन चालवावे.” – उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली.