ठाणे वाहतूक पोलिसांची डय़ुटी आता आठ तास
ऊनपाऊस अंगावर झेलत रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या ठाण्यातील वाहतूक पोलिसांना आता या कर्तव्यातून काही अंशी दिलासा मिळणार आहे. कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर आणि पर्यायाने कामावर होणारा परिणाम दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना आठ तासांची ‘डय़ुटी’ लावण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे. सुमारे साडेपाचशे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेच्या ताफ्यात आहेत. हे मनुष्यबळ कमी पडत असल्याने पोलिसांच्या मदतीला वाहतूक सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तरीही शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण पोलिसांवर कारम आहे. अपुरे पोलीस बळ असल्यामुळे तसेच कामाच्या वेळेचे नियोजन नसल्यामुळे अनेकदा कोंडीचे चक्रव्यूह भेदताना कर्मचाऱ्यांना दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. वाहनांचा आवाज, धूळ, माती यामुळे ध्वनी तसेच वायुप्रदूषणाचा सामना करत दिवसभर चौकात तासन्तास उभे राहून वाहतुकीचे नियोजन कर्मचारी करीत असतात. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणेही त्यांना शक्य होत नाही. ही बाब ठाणे वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्या निदर्शनास आली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आठ तास करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचे दोन टप्प्यांत नियोजन आखण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील महत्त्वाच्या जंक्शनवरील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आठ तास करण्यात आली असून त्यासाठी सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते ११ अशा आठ तासांच्या दोन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक युनिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येते. या कर्मचाऱ्यांच्या नावासह त्यांच्या कामाच्या वेळेचे वेळापत्रक एक दिवस आधीच दिले जाते. तसेच दुसऱ्या टप्प्यात वाहतूक कोंडीची समस्या कमी असलेल्या भागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ मात्र, दहा तास करण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ अशी त्याच्या कामाची वेळ असून यात त्यांना दोन तासांची मोकळीक देण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली.