डोंबिवली : कल्याण शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बहुतांशी वाहन चालक उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. यामुळे सरळ मार्गाने येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा येऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. अशा वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या ७१ बेशिस्त वाहन चालकांविरुध्द बुधवारी कोळसेवाडी वाहतूक विभागाने मानपाडा पोलीस ठाण्यात वाहतूक नियमभंग, दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी कृती करणे या कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिळफाटा रस्त्यावर रुणवाल गार्डन संकुलासमोर, सोनारपाडा, गोळवली भागात रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या मधोमध मेट्रो कामासाठी ठेकेदाराने संरक्षित पत्रे लावले आहेत. या पत्र्यांमुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी रस्ते अरूंद झाले आहेत. या अरूंद भागात दररोज वाहन कोंडी होते. ही कोंडी झाली की अनेक वाहन चालक उलट मार्गिकेतून येऊन या अरूंद रस्त्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

शिळफाटा रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली पत्रीपूल ते पलावा, देसई, खिडकाळीपर्यंत वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असतात. मेट्रो कामाच्या ठिकाणी दुतर्फा वाहतूक पोलीस तैनात असतात. अनेक वाहन चालक शिळफाटा रस्त्यालगतच्या पोहच रस्त्यावरून येऊन शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेत घुसतात. समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नियमितची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत असताना, बेशिस्त वाहन चालकांमुळे निर्माण झालेली कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. उलट मार्गिकेतून येणारे चालक कोंडी करत असल्याने अशा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय वरिष्ठांच्या आदेशावरून घेतला आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी सांगितले.

७१ गुन्हे दाखल

बुधवारी दुपारी शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक, रुणवाल गार्डन (मेट्रो कामे सुरू) ते काटई चौक दरम्यान रुणवाल गार्डन ते मानपाडा चौक दरम्यान उलट मार्गिकेतून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्या वाहन क्रमांकावरून त्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात वाहतूक हवालदार सचिन बोरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता नियमित घेतली जात आहे. अनेक वाहन चालक शिळफाटा रस्त्यालगतच्या पोहच रस्त्यावरून, अंतर्गत रस्त्यावरून शिळफाटा रस्त्यावर येतात. वेगाने पुढे जाऊ असा विचार करून उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. या चालकांमुळे शिळफाटा रस्त्यावर मेट्रो कामाच्या ठिकाणी सर्वाधिक कोंडी होत असल्याने अशा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी अशा ७१ चालकांंवर गुन्हे दाखल केले आहेत. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police registered cases against two wheeler riders driving in opposite direction at shil pahata road asj