कल्याण – कल्याणमधील गांधारी नदी पात्रात घरातील निर्माल्य टाकण्यासाठी गेलेली महिला रविवारी नदीला आलेल्या पुरातील चिखलात अडकली होती. ही माहिती नदी काठाने चाललेल्या एका नागरिकाला समजात त्याने हा विषय गांधारी नदी काठच्या वाहतूक चौकीत असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना सांंगितला. दोन्ही पोलिसांनी तत्परात दाखवत नदी काठी धाव घेऊन चिखलात अडकून वाहून जाण्याची शक्यता असलेल्या वृध्देला वाचविले.
या धाडसाबद्दल कल्याण शहर शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक श्रेयस समेळ, शाखाप्रमुख रोहन कोट, कुणाल कुलकर्णी, सुनील वाघ, चैतन्य महाडिक, विजया पोटे, अरविंद पोटे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण वाहतूक शाखेचे हवालदार मच्छिंद्र चव्हाण, वाहतूक सेवक संजय जैस्वार यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणारा औषध निरीक्षक अटकेत
रविवारी मुसळधार पाऊस पडल्याने गांधारी नदीला पूर आला होता. अशा परिस्थितीत खडकपाडा भागातील एक वृध्द महिला घरातील देवाला वाहिलेले फुलांचे निर्माल्य नदीत टाकण्यासाठी आल्या होत्या. नेहमीप्रमाणे आपण निर्माल्य पाण्यात फेकून देऊ असे वृध्देला वाटले. त्या नदीच्या किनार पोहचल्या. पण तेथे पावसामुळे दलदल असल्याने त्यांचे पाय गाळात अडकले.
त्यांना जागचे हलता येईना. त्या पुराच्या पाण्यात काठाने वाहून जाण्याची शक्यता होती. नदी काठी असलेल्या एका नागरिकाला एक महिला नदी काठी नुकतीच दिसत होती. ती कोठे गायब झाली म्हणून तो बघू लागला तर त्याला एक महिला पुराच्या पाण्यातील गाळात अडकून ती वाहून जाण्याची शक्यता दिसली. या नागरिकाने तातडीने गांधारी नदी काठच्या वाहतूक चौकीत येऊन हवालदार चव्हाण, जैयस्वार यांना ही माहती दिली.
हेही वाचा >>>शेअर व्यवहारातून कल्याणमधील वृध्दाची १९ लाखाची फसवणूक
त्यांनी तातडीने नदी काठी जाऊन जीवाचा पर्वा न करता गणवेशताच नदी पात्रात उतरून गाळात अडकलेल्या महिलेला पहिला दूरवरून धीर दिला. त्या दिशेने पाण्यातून जाऊन त्या महिलेच्या साडीचा पाण्या बरोबर पसरलेला पदर पकडला. त्या पदराला आपल्या दिशेने खेचून हवालदार चव्हाण, जैयस्वार यांनी महिलेला नदी काठी पाण्याच्या प्रवाहातून खेचत आणले. घाबरलेल्या या महिलेला हवालदारांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने या महिलेचा जीव वाचला. वाहतूक पोलिसांच्या या तत्परतेबद्दल वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.