ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. यामुळे मध्यरात्री माजिवडा उड्डाणपूलावरील वाहतुक बंद करण्याची वेळ येते. परंतु रविवारी या कामासाठी ‘एमएमआरडीए’ने वाहतुक साहाय्यकच पुरविले नाही. तसेच वाहतुकी बाबतचे फलकही उभारले नाही. परवानगी देताना सर्व नियोजन करणे अपेक्षित असतानाही एमएमआरडीएच्या असहकारामुळे वाहतुक पोलिसांनी रविवारी त्यांचे काम बंद केले. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक साहाय्यकांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुक साहाय्यक पुरविल्यानंतरच, त्यांना कामाची परवानगी देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्ग हा नाशिक, भिवंडी आणि घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गालगत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामासाठी एमएमआरडीएने ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारले आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य वाहिन्या अरुंद झाल्या आहेत. तसेच ५ एप्रिलपासून एमएमआरडीएने ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाच्या छत उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामासाठी ज्युपिटर रुग्णालयासमोरील उड्डाणपूलाच्या चढणीवर मोठी क्रेन ठेवण्यात येणार असल्याने वाहतुक पोलिसांनी सुरक्षा आणि कोंडी टाळण्याच्या दृष्टीने मध्यरात्री कामास परवानगी दिली. या कामासाठी वाहतुक पोलिसांनी ३५ वाहतुक साहाय्यक आणि वाहतुक बदला बाबतचे फलक बसविण्याची विनंती एमएमआरडीएकडे केली होती.

पहिल्या दिवशी म्हणजेच, पाच एप्रिलला एमएमआरडीएने वाहतुक साहाय्यक पुरविले. परंतु फलक बसविले नव्हते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी रात्री ११ वाजता पुन्हा एमएमआरडीएने कामास सुरुवात केली. परंतु यावेळी वाहतुक पोलिसांच्या मदतीस एमएमआरडीएकडून वाहतुक साहाय्यक पुरविण्यात आले नाही. त्याचा परिणाम रात्री वाहतुक व्यवस्थेवर झाला. महामार्गावर अवजड वाहनांचा भार वाढल्याने काहीकाळ वाहतुक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रात्री १ वाजताच्या सुमारास एमएमआरडीएला काम बंद करण्याच्या सूचना केल्या. काम बंद झाल्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. एमएमआरडीएने वाहतुक साहाय्यक पुरविल्यास वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होऊ शकते. परंतु वाहतुक साहाय्यक उपलब्ध करुन दिले नाही तर कोंडी वाढू शकते. त्यामुळे हे काम थांबविल्याचा दावा वाहतुक पोलिसांनी केला.

मेट्रो स्थानकाचे नेमके काय काम सुरू आहे?

ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो मार्गिकेचे रेल्वे स्थानक तयार केले जात आहे. स्थानकात छतांसाठी अवजड आणि मोठे खांब उभारले जात आहे. ते लहान आकाराच्या क्रेनने उचलणे शक्य नसल्याने त्यासाठी अवजड खांब उचलणारी क्रेन वापरली जात आहे. ही क्रेन उड्डाणपूलावर उभी करुन स्थानकासाठीचे खांब बसविले जात आहे. तसेच तिची जोडणी देखील केली जात आहे. असे एकूण ४६ खांब उभारले जाणरा आहेत.

एमएमआरडीएने रविवारी रात्री वाहतुक साहाय्यक उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे ते काम थांबविण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना वाहतुकक साहाय्यक उपल्बध करुन देण्याच्या आणि परिसरात फलक उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.