जादा कमाईसाठी चौथी सीट घेणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात अशी कारवाई सुरू असून या दंडवसुलीला रिक्षा चालक-मालक संघटनांनी विरोध केला आहे. भाजपच्या रिक्षा संघटनेने कारवाईला पाठिंबा दिला आहे, तर सेनेच्या रिक्षा संघटनेने शहरातील सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असला तरी त्यामध्ये सातत्य राखले जाणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. मात्र ही कारवाई केवळ वरिष्ठांनी ठरवून दिलेले वर्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरू असल्याचे खुद्द वाहतूक विभागाचे अधिकारीच सांगत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाची ही कारवाई केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाहतूक विभागाने रिक्षाचालकांना प्रवासी भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र एका फेरीमध्ये जास्तीत जास्त प्रवासी घेऊन पैसे कमविण्याची रिक्षाचालकांची युक्ती असते. त्यामुळे रिक्षाचालक चार प्रवासी एकावेळेस बसवतात. लांबचा पल्ला असेल तर काही रिक्षाचालक पाच प्रवासी भाडे घेऊन प्रवास करतात. मात्र हे नियमबाह्य़ असल्याचा साक्षात्कार आता वाहतूक विभागाला झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसात दीडशे रिक्षाचालकांवर या संदर्भात कारवाई करण्यात आली. त्यामधून साधारण ३० हजाराहून अधिक रक्कम दंडवसुली झाली आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २० जणांविरोधात गेल्या दोन दिवसात कारवाई केल्याची, माहिती शहर वाहतूक नियंत्रण कक्ष उपशाखा डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली.

वाहतूक विभागाच्या या कारवाईला शहरातील रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. कल्याण रोडवर जाणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात केवळ ही कारवाई केली जात आहे. शहरात सर्वच रिक्षाचालक चार प्रवासी भाडे आकारतात. त्यामुळे सर्व ठिकाणच्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात यावी, असा रिक्षाचालकांचा पवित्रा आहे.

भाजपच्या रिक्षा संघटनेने वाहतूक विभागाच्या या कारवाईला पाठिंबा दिला आहे. शहरात या स्वरूपाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. शिवसेना रिक्षा संघटनेने मात्र या कारवाईला विरोध आहे. शहरातील सर्व विभागातील रिक्षाचालकांवर ही कारवाई करावी, अशी  मागणी त्यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी काही रिक्षा युनियनने रिक्षा बंद ठेवत या कारवाईला विरोध दर्शविला. त्यामुळे ही कारवाई थोडीशी शिथिल केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police taken action against private transport