पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे गुदमरले आहेत. त्यातच महाड येथील दुर्घटनेनंतर कळव्यातील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे सकाळी कळव्यातून ठाण्याच्या दिशेला येणे अथवा ठाण्यातून बेलापूर रोड किंवा मुंब्य्राच्या दिशेला जाणे जिकिरीचे ठरते आहे. वाहतूक पोलीस यंत्रणा काम करीत असली तरी वाहनांची संख्या आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यातच पुलांची सुरू असलेली कामे यामुळे सध्या तरी ठाणेकरांची यातून सुटका होईल असे दिसत नाही.

ठाणे शहरातील कळवा नाका, कोर्ट नाका, टेंभी नाका, जांभळी नाका, घंटाळी, तीन पेट्राल पंप या संपूर्ण परिसरात सध्या सकाळी आणि संध्याकाळी प्रंचड वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांचेही प्रचंड हाल होत आहेत. याबाबत कायमस्वरूपी उपाय म्हणून ठाणे महापालिकेने शहराअंतर्गत उड्डाण पुलांची कामे हाती घेतली आहेत. एमटीएनएल जंक्शन, वंदना सिनेमा जंक्शन, खोपट जंक्शन अशा महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर कळवा नाक्यावरही नव्या मोठय़ा उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. हे पूल दोन वर्षांत उभे राहतील. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल. तरीही प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण तोपर्यंत वाहनांची संख्या वाढणार हेही सत्य आहे. नौपाडा परिसरात टॉवर उभे राहू लागले आहेत. घोडबंदरही अजून बांधकामे सुरूच आहेत. याचा एक प्रचंड ताण शहराच्या वाहतुकीवर पडणार आहे. मेट्रोची घोषणा झाली आहे, तेही काम सुरू होईल. त्याने महामार्गावरील मुंबईला ये-जा करणाऱ्या वाहनांचा ताण कमी होणार आहे. पण जर मेट्रो सुरू झाली तर त्यानंतर ठाण्यात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे मनोरुग्णालयाच्या ठिकाणी विस्तारित ठाणे स्टेशनलाही मंजुरी देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होणार आहे. पण तरीही ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आता ठाणे शहरातील वाहतुकीचा नवा नकाशा तयार करावा लागणार आहे.

नव्याने झालेल्या शाळा, हॉस्पिटल, मॉल, दुकाने याचा विचार करून हा नकाशा तयार करण्याची गरज आहे. यामध्ये काही मार्ग एक दिशाही करावे लागणार आहेत, तर काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. काही ठिकाणी रहिवाशांचा विरोध होण्याची शक्यता आहे. पण ठाणेकर समजूतदार आहेत. म्हणूनच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रस्ता रुंदीकरण झाले त्यावेळी त्यांनी सहकार्य केले. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजय जैस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची एक धडक मोहीम हाती घेतली आणि टी. चंद्रशेखर यांची ठाणेकरांना आठवण करून दिली. असेच आता थोडेसे अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या याबाबत आयुक्तांनाच कठोर व्हावे लागेल. ठाणेकरांना आयुक्तांना साथ द्यावी लागेल. ठाण्यात राजकीय पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हीच वेळ आहे महापालिका, पोलीस आणि राजकीय नेतृत्वाने शहराच्या वाहतूक नियोजनाला दिशा देण्याची. काही दिवसात गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर नवरात्र उत्सव सुरू होईल. त्याने वाहतूक कोंडी वाढणार आहे. त्यामुळे अधिकच गुदमरण्याआधीच याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.

पार्किंगमुळेही काही छोटे रस्ते जाम होतात. घंटाळी रोडला तर दोन्ही बाजूने गाडय़ा उभ्या असतात. त्यामुळे स्टेशनकडे येणारी वाहने खोळंबतात. त्यातच तीन पेट्रोल पंप, खोपट येथे असणाऱ्या सीएनजी पंपावर रिक्षांच्या तासन्तास रांगा लागतात. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचा नकाशा बदलत गेला, पण त्या पद्धतीने शहराच्या वाहतुकीचा नकाशा बदलला नाही. आता ही वेळ आली आहे, एवढे मात्र नक्की.

Story img Loader