कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहरातील महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते सिमेंटचे व प्रशस्त करण्यात आले आहेत. या प्रशस्त रस्त्यांमुळे काही भागातील वाहतुकीत सुसूत्रता येण्यास सुरुवात झाली आहे. चार ते पाच वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत सिमेंटीकरणाचे रस्ते सुरू आहेत. रस्तेकामात आलेले अडथळे, ठेकेदाराची उदासीनता, अधिकाऱ्यांची निष्क्रियता, सल्लागाराचे पलायन अशा अनेक कारणांमुळे १८ महिन्यांच्या मुदतीचे रस्ते दोन ते तीन वर्षे उलटली तरी सुरू आहेत. नवीन रस्ते सुरू करण्यापूर्वी रखडलेले सर्व रस्ते पहिले पूर्ण करा, असे सक्त आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले आहेत. त्यामुळे या सिमेंटच्या रस्त्यांच्या कामाला जलदगतीने सुरुवात झाली आहे. पुढील वर्षभरामध्ये कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना सुटसुटीत रस्त्यांचा अनुभव घेणे यामुळे शक्य होणार आहे. येत्या ३१ मेपर्यंत कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे.
अंतर्गत, बाह्य़वळण रस्त्यामुळे शहराला लाभ
कल्याणमधील रखडलेला गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता युद्धपातळीवर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या तबेले मालकाला पर्यायी जागा देण्याचे पालिका जोरदार प्रयत्न करीत आहे. गजबजलेला शिवाजी चौक रस्ता रुंदीकरणातून मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वळण रस्त्यामुळे कल्याणमधील वाहतुकीवर जो ताण येत होता, तो निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी होईल. कल्याणमध्येच शहाड ते बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा ते आधारवाडी, गंधारे परिसरातील रस्ते सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहेत. २४ मीटर रुंदीचे हे प्रशस्त रस्ते सध्या शहाड, उल्हासनगर, नवीन कल्याणमधील वाहनांचा भार सहन करीत आहेत. कल्याण पूर्व भागात तिसगाव नाका ते काटेमानिवली रस्ता प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच आढळणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणेश मंदिरापर्यंतचा प्रशस्त सिमेंट रस्ता भाविकांना गणपतीच्या दारात पुष्पक विमानातून नेतो की काय, इतका हा रस्ता प्रशस्त आणि सुबक करण्यात आला आहे.
डोंबिवलीतील रखडलेल्या रस्त्यांना सुरुवात..
ठाकुर्ली येथील डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरील उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. रेल्वेने उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे कोपर उड्डाण पुलावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. माणकोली उड्डाण पुलाचे काम एमएमआरडीए करणार आहे. या पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीसह कल्याण, २७ गाव परिसरातील बहुतांशी वाहने ठाणे, मुंबई परिसरात जाण्यासाठी माणकोली उड्डाण पुलाचा वापर करतील. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ येणारा वाहनांचा भार कमी होण्यास साहाय्य होणार आहे. २७ गावांच्यामध्ये विकास आराखडय़ाप्रमाणे व नवीन प्रस्तावित रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पत्री पूल ते कांचनगाव-ठाकुर्ली रस्ता
* कल्याणमधून डोंबिवलीकडे येणारी वाहने यापुढे शिळफाटा मार्गाने न जाता पत्री पूल येथे उजवे वळण घेऊन, कचोरे, कांचनगाव-ठाकुर्ली रस्त्याने डोंबिवलीत आठ ते नऊ मिनिटात येतील.
* काही वाहने ठाकुर्लीतील हनुमान मंदिराकडून नेहरू रस्त्याने, पेंडसेनगरमधून डोंबिवलीत येतील.
* या रस्तेकामांसाठी सुमारे २१ कोटी खर्च
* आतापर्यंत कल्याणकडून थेट डोंबिवली किंवा डोंबिवलीतून थेट कल्याणला येणारा रस्ता नव्हता. पत्री पूल ते कांचनगाव रस्त्यामुळे ही बाब भरून आली आहे.
माणकोली उड्डाण पूल..
* डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर ते माणकोलीदरम्यान एक किमीचा उड्डाण पूल.
* या पुलामुळे डोंबिवलीतील ठाणे, नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने उड्डाण पुलावरून माणकोली मार्गे मुंबई नाशिक महामार्गाला पोहचतील.
* या उड्डाण पुलामुळे डोंबिवली ते ठाणे अंतर अवघ्या २५ मिनिटांत वाहनाने कापता येईल. कल्याणचा वाहनचालक पत्री पूल, * ठाकुर्ली उड्डाण पुलावरून डोंबिवली पश्चिमेत येऊन तेथून उड्डाण पुलावरून ठाणे येथे जाऊ शकेल.
पुलासाठी सुमारे ३८० कोटी खर्च आहे.