ठाणे : घोडबंदर येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे मानपाडा ते कासारवडवली या भागात गर्डर उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर ३१ ऑगस्टपर्यंत मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. येथील अवजड वाहतूक मुंबई नाशिक महामार्ग तसेच कशेळी काल्हेर भागातून वळविण्यात येत असल्याने रात्री या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते.
वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी घोडबंदर येथील मानपाडा आणि कासारवडवली भागात गर्डर उभारले जात आहे. या कालावधीत अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक शाखेने मार्गावर ३१ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहे. अवजड वाहनांना रात्री ११.५५ ते पहाटे पाच या वेळेत घोडबंदर मार्गावर बंदी असणार आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात कार खाडीत नेऊन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्थानिक रहिवाशाने वाचविले तरुणाचे प्राण
असे आहेत वाहतूक बदल
– मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटा किंवा कशेळी काल्हेर येथून वाहतूक करतील.
– मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहतूक खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतूक करतील.
– नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवे वळण घेऊन अंजूरफाटा मार्गे वाहतूक करतील. – मानपाडा येथे गर्डरचे काम सुरू असल्याने हलकी वाहने मानपाडा पूल, टिकूजीनीवाडी, निळकंठ संकुल, मुल्लाबाग येथून वाहतूक करतील. तर कासारवडवली येथे वाहने आनंदनगर, सेवा रस्ता मार्गे वाहतूक करतील.