ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांनिमित्ताने ठाणे शहरात येणार आहेत. या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. शनिवारी दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या स्पर्धांचे उद्घाटन आज, गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साकेत मैदानात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून शहरातील साकेत मैदान, पोलीस कवायत मैदान, सिद्धी सभागृहात सुरू आहेत. राज्यातील सर्व पोलीस दलातील सुमारे तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धांचा समारोप साकेत मैदान येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमावेळी कोर्टनाका परिसरात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, क्रीक नाका येथून कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे कारागृह मार्ग, जीपीओ येथून वाहतुक करतील. कोर्टनाका येथून पॅव्हेलियन उपाहारगृह, आरटीओ मार्गे ठाणे कारागृहाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना पॅव्हेलियन उपाहारगृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कोर्टनाका, जीपीओ मार्गे वाहतुक करतील. उर्जिता उपाहारगृह, कोर्टनाका, पॅव्हेलियन उपाहारगृह, ठाणे कारागृह परिसरात वाहने उभी करण्यास बंदी असणार आहे. हे वाहतुक बदल शनिवारी दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत लागू असतील.