ठाणे, वसई : ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम असतानाच, पहाटे ३ वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबई व गुजरात या दोन्ही मार्गिकांवर ८ ते १० किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
घोडबंदर मार्गे वसईच्या दिशेने जाणारी वाहतूक मुंबई-नाशिक आणि जुना मुंबई-आग्रा मार्गावरून वळविण्यात आल्याने या मार्गांवर भार वाढून कोंडी झाली. अखेर वाहतुकीसाठी बंद असलेल्या घोडबंदर मार्गावर वाहने सोडून ती फाऊंटेन हॉटेल ते गायमुख घाट परिसरात रोखून धरण्यात आल्याने त्याचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांनाही बसला.
वसई फाट्याजवळील अपघातात सिलिंडर गळती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत होती. उरण येथील जेएनपीटी बंदरातून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूकही ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-आग्रा महामार्ग येथून भिवंडी मार्गे गुजरातच्या दिशेने वळविण्यात आली. कशेळी,काल्हेर, अंजुरफाटा, कोपर या अंतर्गत मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली. शिवाय, ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा, कापूरबावडी या भागात वाहतूक कोंडी झाली होती. माजिवडा भागात ट्रक बंद पडल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडी वाढू लागताच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहतुकीसाठी बंद असलेल्या घोडबंदर मार्गावरून अवजड वाहने सोडण्यास सुरुवात केली. ही वाहने पुढे फाऊंटेन हॉटेल ते गायमुख घाट येथे एका मार्गिकेवर रोखून ठेवण्यात आली. या वाहनांच्या रांगा कापूरबावडीपर्यंत आल्याने त्याचा फटका शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला बसला.
भिवंडीत आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून भिवंडी ग्रामीण म्हणजेच कशेळी-काल्हेर भागातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या भागात मोठी गोदामे असून तेथील रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे वाहतूक संथगतीने होऊन कोंडी होते. यामुळे संतप्त झालेले पालक, शिक्षकासह विद्यार्थ्यांनी कोपर भागातील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ठिय्या मांडला. वाहतूक पोलिसांनी भेट घेऊन समजूत काढल्यानंतर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि या मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होता. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरासह इतर शहरांमध्ये सखल भागात पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते दुपारी ५.३० या कालावधीत ७८.४६ मिमी पाऊस झाला. पावसादरम्यान, तुळशीधाम भागातील धर्मवीर नगर परिसरात असलेला लोखंडी बस थांबा पडला. दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अंबरनाथ, उल्हासनगर तसेच बदलापूर शहरात शनिवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. दुपारी तिन्ही शहरांमध्ये पावसाचा जोर वाढला.
वसई फाटा येथे झालेल्या अपघाताने शनिवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पंधरा तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी होती. यावेळी आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा होत्या.
महामार्गावर अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सिलिंडरमध्ये हायड्रोजन असल्याने विलंब झाला. सिलिंडर व ट्रक बाजूला केल्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्वपदावर आली.-विठ्ठल चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस, चिंचोटी केंद्र