कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक रिक्षा चालक रिक्षेला बनावट वाहन क्रमांक लावून प्रवासी वाहतूक करतात. अशा बेशिस्त रिक्षा चालकावर कारवाई करताना अनेक वेळा वाहतूक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्या रिक्षेचा वाहन क्रमांक मोबाईलव्दारे टिपून ई चलान यंत्राव्दारे त्या वाहन चालकाला ऑनलाईन माध्यमातून दंडात्मक नोटीस पाठवितात. अनेक वेळा कारवाई झालेल्या रिक्षा चालकाने बनावट वाहन क्रमांक रिक्षेला लावल्याने त्या रिक्षेवरील कारवाईची दंड नोटीस मूळ सरळमार्गी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाला जाते, अशी माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी राज्याचे परिवहन आयुक्त यांना दिली आहे.
स्थानिक पातळीवर रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करताना असे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. या दंडाचा बोजा अनावश्यक सरळमार्गी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. कारवाई करण्यापूर्वी त्या रिक्षा चालकाच्या कागदपत्र, परमिट, परवाना, बिल्ला याची खात्री करावी, मगच बेशिस्त रिक्षा चालकावर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष पेणकर यांनी परिवहन आयुक्तांबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण यांच्याकडे केली आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभागाकडून अनेक वेळा वाहन तपासणी मोहीम हाती घेतली जाते. कल्याण डोंबिवली परिसरात ही उपक्रम नियमित आरटीओ विभागाकडून राबविला जातो. शिस्तबध्द प्रवासी वाहतूक होण्यासाठी अशाप्रकारची कारवाई आवश्यक आहे, असे अध्यक्ष पेणकर यांनी सांगितले. ही कारवाई करत असताना अनेक वेळा काही बेशिस्त रिक्षा चालक उपप्रादेशिक परिवहन विभागाचा जवळ परवाना नसताना, रिक्षेचे आयुर्मान संपले असताना बनावट वाहन क्रमांक तयार करुन तो रिक्षेला लावून प्रवासी वाहतूक करतात. हे रिक्षा चालक रिक्षा वाहनतळावर न थांबा रस्ते, चौक, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर थांबून प्रवासी वाहतूक करतात. हे रिक्षा चालक नियमित रिक्षा वाहनतळावर येत नसल्याने नियमितच्या रिक्षा चालकांना ते परिचित नसतात. अशा रिक्षा चालकांवर आटीओ, वाहतूक विभागाने ई चलान माध्यमातून कारवाई केली तर तो वाहन क्रमांक बनावट पध्दतीने त्या रिक्षेला लावलेला असतो. त्या वाहन क्रमांकावरुन अधिकारी संबंधिताला दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस पाठवितात. आपण कोणतीही चूक केली नसताना दंड रक्कम नोटीस का आली म्हणून सरळमार्गी रिक्षा चालक चौकशी करतो. त्यावेळी त्याला आपल्या रिक्षा वाहन क्रमांकाच्या साधर्म्याची बनावट वाहन पट्टी अन्य कोणी रिक्षा चालकाने लावली असल्याचे निदर्शनास येते.
आरटीओ, वाहतूक अधिकारी संबंधित रिक्षा चालकाचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसतात. बेशिस्त रिक्षा चालकाच्या चुकीच्या कृतीचा फटका सरळमार्गी रिक्षा चालकांना बसत आहे. रिक्षा चालक जेव्हा नोटीस मिळते किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा तपासणीसाठी नेतो त्यावेळी त्याला दंड भरल्याशिवाय पुढील कामे करता येत नाहीत. या गुंतागुंतीच्या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी अध्यक्ष पेणकर यांनी परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे. बेशिस्त रिक्षा चालकांच्या गैरशिस्तीचा फटक कल्याण, डोंबिवलीतील अनेक रिक्षा चालकांना बसला आहे.
हेही वाचा: कल्याण: जादूटोण्याने मतिमंद मुलाला बरे करण्याचे दाखवले आमिष; महिलेची लाखोंची फसवणूक
“ रिक्षेला बनावट वाहन क्रमांक लावून काही चालक प्रवासी वाहतूक करतात. अशा रिक्षेवर कारवाई झाली की बनावट रिक्षेचा वाहन क्रमांक अन्य कोणा रिक्षेचा नोंदणीकृत वाहन क्रमांक असतो. त्या वाहन मालकाला बनावट चालकाच्या कृतीचा फटका बसतो. वाहनांवर कारवाई करताना प्रथम त्याची कागदपत्र तपासणी करावी असी मागणी अधिकाऱ्यांना केली आहे” -प्रणव पेणकर, अध्यक्ष कोकण महासंघ, रिक्षा टॅक्सी