ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी भागात सोमवारी एका विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला. मंजने प्रजापती असे त्याचे नाव असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजने ट्रेलर चालवित असताना रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या करण्यात आलेल्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकला त्यांच्या ट्रेलरची धडक बसली. या अपघातात ट्रेलरमधील वाहिन्या (पाईक) अंगावर कोसळून आणि ट्रेलरचा पुढील भागाचा चुराडा होऊन मंजने यांचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडी येथील येवई गाव भागातून मंजने हे सोमवारी मध्यरात्री ट्रेलरमध्ये एका कंपनीच्या वाहिन्या (पाईप) घेऊन न्हावाशेवाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी एका ढाब्याच्या शेजारी सिमेंट वाहून नेणारा ट्रक रस्त्याकडेला धोकादायक अवस्थेत उभा होता. अंधारामध्ये हा ट्रक मंजने यांच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्यांच्या ट्रेलरची समोरील सिमेंटवाहू ट्रकला धडक बसली. अपघातामुळे ट्रेलरच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. तसेच ट्रेलरमधील वाहिन्या या मंजने यांच्या अंगावर उलटले. घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंजने यांना ट्रेलरमधून बाहेर काढले. त्यांना भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिमेंटवाहू ट्रक चालकाविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer driver dies in accident in bhiwandi area on mumbai nashik highway amy