कल्याण- मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी साडे सात वाजता गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या एक्सप्रेसच्या मागे धावणाऱ्या कसारा लोकल, इतर एक्सप्रेस आसनगाव, वासिंद दिशेने थांबविण्यात आल्या. एक तासानंतर इंजिनमधील बिघाड दुरूस्त केल्यानंतर एक्सप्रेस रवाना झाली.
या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. मुसळधार पाऊस त्यात लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईकडून येणारी पाटणा एक्सप्रेस आसनगाव रेल्वे स्थानकात बिघाड दुरुस्त होईपर्यंत थांबविण्यात आली होती. या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कसाराकडे जाणारी कसारा लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात आली, अशी माहिती कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी दिली.
हेही वाचा >>>भाईंदर: मांडवी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
मुंबई, कल्याण परिसरातून अनेक नोकरदार, भाजीपाला विक्रेते कसारा, नाशिककडे कसारा लोकलने जातात. आटगाव जवळ एक्सप्रेसचा खोळंबा झाल्याने नोकरदार, व्यावसायिकांचे हाल झाले. कसारा लोकल वेळेत कसारा स्थानकात पोहचली तर त्यांना या लोकलवर प्रस्तावित असलेल्या नाशिक, सिन्नर,त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बस मिळतात.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील कांदळवन संरक्षणासाठी टोल फ्री क्रमांक
इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता बिघाड दुरुस्त झाल्यानंतर या रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली. तोपर्यंत मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या.