ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानका दरम्यान शुक्रवारी एका उपनगरीय रेल्वेगाडीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावर होऊन उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक काहीकालावधीसाठी ठप्प झाली होती. ठाणे, मुलुंड रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. काही प्रवाशांवर मलुंड ते ठाणे रेल्वे रूळांवरून पायी जाण्याची वेळ आली. सुमारे तासाभराने रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. परंतु रेल्वेचे वेळापत्रक रात्री उशीरापर्यंत विस्कळीत झाले होते. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला. या गर्दीमुळे महिला वर्गाचे सर्वाधिक हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या उपनगरीय रेल्वेगाडीमध्ये रात्री रात्री ७. १५ वाजेच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही गाडी थांबल्याने मुंबईहून ठाणे-कल्याणच्या दिशेने सुटलेल्या जलद आणि धिम्या मार्गिकेवरील उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्यांमध्येच अडकून होते. गाड्यांचा खोळंबा नेमका कशामुळे झाला याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण होते. मुलुंडमध्ये थांबून असलेल्या अनेक रेल्वेगाड्यांमधील ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी चालत येताना दिसत होते.

कल्याण, डोंबिवली भागातून हजारो नागरिक नवी मुंबई आणि ठाण्यात कामानिमित्ताने येत असतात. परंतु रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाल्याने ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि पाचवर तुफान गर्दी झाली होती. प्रवाशांना फलाटावर उभे राहण्यासही जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे पादचारी पूलावरही चेंगारचेंगरी सदृश्य परिस्थिती झाली होती.

अखेर तासाभराने रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड दुरुस्त करून रेल्वेगाडी सुरू झाली. त्यानंतर मध्य रेल्वे मार्गाची परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री उशीरापर्यंत रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. काही नागरिकांनी वातानुकूलीत रेल्वेगाड्या, लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून ठाण्यापुढील प्रवास केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train service disrupted on central railway due to technical glitch zws