ठाणे – स्थानक परिसरातील फलाट क्रमांक दोन वरील पत्र्यावर असलेल्या पालापाचोळ्याला आणि बाजूला असलेल्या झाडाला सोमवारी आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे फलाट क्रमांक १ आणि २ वरील रेल्वे गाड्या दहा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांची फलाटावर काही काळ गर्दी झाली होती.
ठाणे स्थानक मधील फलाट क्रमांक एक आणि दोन हे दोन्ही फलाट एकमेकांना लागूनच आहेत. फलाट क्रमांक १ वरुन मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या धावतात. तर, दोन वरुन कर्जत – कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या धावतात. या स्थानकांवरील पत्र्यावर असलेल्या पालापाचोळ्याला आणि बाजूला असलेल्या झाडाला सोमवारी संध्याकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी स्थानक मास्तर, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थान विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन वाहनासह उपस्थित होते. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. आग लागल्यामुळे फलाट क्रमांक १ वरील आणि २ वरील रेल्वे गाड्या दहा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. ही आग ४ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली. त्यानंतर,फलाट क्रमांक एक आणि दोन वरची रेल्वेसेवा सुरळीत करण्यात आली.