ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावर झाला. या बिघाडामुळे ठाणे, ऐरोली, रबाळे यासह सर्वच महत्त्वाच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाणे स्थानकातील पादचारी पूलावर आणि फलाटावर गर्दी वाढल्याने महिला प्रवाशांचे हाल झाले.
नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घनसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, कारखाने आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप भागातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जात असतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊ, १० -१० अ येथे वाशी, पनवेल आणि नेरूळ या स्थानकांच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या रेल्वेगाड्या थांबतात. मंगळवारी पहाटे नेरूळ स्थानकाजवळ पहाटे ५ वाजेपासून ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) समस्येमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. येथील दुरुस्ती दोन तासांनी पूर्ण झाली.
हे ही वाचा…ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
परंतु ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. रेल्वेगाड्यांची वाहतुक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरू होता. सकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील ट्रान्स हार्बर मार्गिकेच्या फलाटांवर तुफान गर्दी उसळली होती. रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीबाबत प्रवाशांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. पादचारी पुलावर काही प्रवासी थांबल्याने पुलावर देखील गर्दी झाली. गर्दीमुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती.