ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान मध्य रेल्वेचे दुरुस्ती वाहन रुळांवरून घसरल्याने गुरुवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गाची लोकल सेवा ठप्प झाली. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या गोंधळामुळे ठाण्याहून नवी मुंबईकडे आणि उलट दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यातच अवजड वाहनांमुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरही प्रचंड कोंडी झाल्याने प्रवासाचा ठाणे आणि नवी मुंबईचा संपर्कच जणू तुटला होता. त्यामुळे प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गाची वाहतूक बुधवारी रात्री बंद झाल्यानंतर मध्यरात्रीपासून या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी आणण्यात आलेले दुरुस्ती वाहनच पहाटे पावणेपाचच्या सुमारास ऐरोली स्थानकाजवळ रुळांवरून घसरल्याने रुळांचे नुकसान झाले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून ट्रान्स हार्बर सेवा बंद पडली. अपघातानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र वाहतूक सुरळीत व्हायला साडेनऊ वाजले. या दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची स्थानकांत मोठी गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेने प्रवाशांना कुर्लामार्गे प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र, मध्य रेल्वेवरील नेहमीची गर्दी पाहून प्रवाशांनी रस्तेमार्गे नवी मुंबई गाठण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे ठाण्यातील सिडको बस स्थानक तसेच अन्य ठिकाणी बससाठी मोठी गर्दी उसळली होती.
लोकलसेवा विस्कळीत असतानाच अवजड वाहनांच्या गर्दीमुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. एरवीही वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या या रस्त्यावर गुरुवारी प्रवासी वाहतुकीचाही ताण पडला व त्याची परिणिती वाहतूक कोंडीत झाली. त्यामुळे रेल्वेऐवजी रस्त्यावरून प्रवास करणारे दोन तास वाहतूक कोंडीतच अडकून पडल्याचे चित्र होते.
ट्रान्सकोंडी!
ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान मध्य रेल्वेचे दुरुस्ती वाहन रुळांवरून घसरल्याने गुरुवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गाची लोकल सेवा ठप्प झाली.
First published on: 19-06-2015 at 12:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trans harbour local services off at peak time