लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बदल्या केल्या आहेत. हे कामगार दहा प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अतिक्रमण नियंत्रण विभागात कार्यरत होते.

फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण विभागात अनेक कामगार एकाच प्रभागात अनेक वर्ष कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे फेरीवाले, बेकायदा बांधकाम करणारे भूमाफिया यांच्याशी साटेलोटे होते. पालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी वारंवार आदेश देऊनही कल्याण, डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटत नव्हते. फेरीवाला हटाव पथकातील कामगारांचे फेरीवाल्यांबरोबर असलेले साटेलोटे याला कारणीभूत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

आणखी वाचा-डोंबिवलीत दुकानदारांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय

तसेच, पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना पाठिंबा देण्यात अतिक्रमण नियंत्रण विभागातील काही कामगार सामील असल्याची चर्चा होती. त्यामुळे पालिकेने बेकायदा बांधकामांवर कितीही आक्रमक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला तरी या विभागातील कामगारांच्या हस्तक्षेपामुळे बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारदारांच्या तक्रारी होत्या. यापूर्वी अशाचप्रकारे फेरीवाला हटाव पथक, अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामगारांच्या बदल्या तत्कालीन आयुक्तांनी केल्या होत्या. परंतु, बहुतांशी कामगारांनी राजकीय दबाव आणून, मंत्रालयातील आपल्या वरिष्ठ नातेवाईकांचा दबाव आणून फेरीवाला, अतिक्रमण नियंत्रण विभागातून अन्य विभागात बदली होणार नाही याची काळजी घेतली होती. त्यामुळे आताही तसाच प्रकार होणार नाही याची काळजी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना घ्यावी लागणार आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये राजकीय फलक फाडून राजकीय,सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न

फेरीवाल्यांच्या विरुध्द, बेकायदा बांधकामांच्या विरुध्द नेहमीच तक्रार करणाऱ्या तक्रारदारांनी मात्र या बदल्यांविषयी समाधान व्यक्त केले आहे. या कामगारांच्या बदल्यांमुळे प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फेरीवाला हटविणे, बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास बळ मिळणार आहे. यापूर्वी अशी काही कारवाई असली की फेरीवाले, बेकायदा बांधकामांची पाठराखण करणारे कामगार अगोदरच फेरीवाले, भूमाफियांना कारवाईची माहिती देऊन त्यांना सावध राहण्याची भूमिका बजावत होते. त्यामुळे कारवाईत अडथळे येत होते. बदली कामगारांमध्ये काही मातब्बर कामगारांचा समावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of 134 workers of hawker removal team in kalyan dombivli municipality mrj