कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेत गेल्या दोन वर्षापासून १० प्रभाग हद्दीत काम करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांच्या दर दोन ते तीन महिन्यांनी सोयीप्रमाणे बदल्या करण्यात येत असल्याने प्रभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नवीन येणारा साहाय्यक आयुक्त आपली स्वताची कामाची पध्दत विकसित करेपर्यंत त्याची बदली झालेली असते. त्यामुळे प्रभाग कार्यालयातील कामकाजात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे, अशा तक्रारी १० प्रभाग कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
यापूर्वी प्रभागातील साहाय्यक आयुक्त बदलीचे काम सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त पातळीवर केले जात होते. या किरकोळ बदल्यांमध्ये आता थेट आयुक्त उतरत असल्याने आयुक्तांना अन्य इतर कामे राहिली आहेत की नाही असे प्रश्न कर्मचारी, माजी नगरसेवक खासगीत उपस्थित करत आहेत. प्रभागात साहाय्यक आयुक्त पदावर काम करण्यासाठी अनेक पात्र उच्च विद्याविभूषित कर्मचारी उपलब्ध असताना ठराविक हुजरेगिरी, अपात्र कर्मचाऱ्यांना साहाय्यक आयुक्त पदी नियुक्त्या देण्यात येत असल्याने पात्र उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा: नोकर भरतीतील फसवणूक टाळण्यासाठी भिवंडी पालिकेचे नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
प्रशासनात वरिष्ठ पातळीवर गटतटाचे राजकारण होत असल्याने त्याचा फटका सरळमार्गी कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे समजते. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांचा बंदोबस्त करण्यासाठी नगररचना विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता व इतर प्रभागात बदल्या केल्या होत्या. आयुक्त डाॅ.भाऊसाहेब दांडगे सुट्टीवरुन परत येताच त्यांनी अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी केलेल्या बदल्या तडकाफडकी रद्द केल्या. असाच प्रकार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमध्ये होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात प्रशासनातील काही वरिष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याविषयी बोलणे टाळले.
रोकडे यांची उचलबांगडी
डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभागीय उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त यांनी आदेश देऊनही बेकायदा बांधकामे न पाडता त्यांचे संरक्षण करणारे वाद्ग्रस्त साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांची आयुक्त डाॅ. दांडगे यांनी अडगळीच्या आपत्कालीन विभागात तडकाफडकी बदली केली आहे. रोकडे हे बेकायदा बांधकामांचे संरक्षण करत असल्याने त्यांच्याविषयी पालिकेत अनेक तक्रारी होत्या. त्यांच्या निलंबनाच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मनुष्यबळाचा विचार करुन तो प्रस्ताव मागे पडला असल्याचे समजते. साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी वरिष्ठांनी दिलेल्या एकाही बेकायदा बांधकामावर कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. रोकडे हे शिक्षण विभाग आस्थापनेवरील कर्मचारी आहेत. तरीही प्रशासनाने त्यांना साहाय्यक आयुक्त पद दिल्याने समपदपस्थ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
भरत पाटील काही महिन्यापूर्वी डोंबिवलीतील फ प्रभागात सेवारत असताना त्यांनी बेकायदा बांधकामांना अभय दिले. ठाकुर्ली, खंबाळपाडा भागातील बेकायदा बांधकामांना नोटिसा देणे, एमआरटीपी करणे व्यतिरिक्त एकही कारवाई केली नाही. त्यांच्या कार्यपध्दती विषयी अनेक तक्रारी असताना आयुक्त दांगडे यांनी पाटील यांना पुन्हा फ प्रभागात नियुक्ती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील हे लेखा परीक्षण विभागातील तांत्रिक सेवेतील कर्मचारी आहेत. त्यांना साहाय्यक आयुक्त पद देता असताना नियमबाह्यपणे हे पद त्यांना देण्यात आले आहे, असे समपदस्थ कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: ठाणे: डेबिट कार्ड हरविल्याने शिक्षकाच्या खात्यातून लाखो रुपये गायब
सर्व प्रभागातील साहाय्यक आयुक्तांच्या बदल्या होत असताना ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांची बदली प्रशासन करण्यात येत नसल्याने अनेक कर्मचारी नाराज आहेत. पवार हे लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असल्याने प्रशासन त्यांना अभय देते असे समजते. चौकशीच्या फेऱ्यातील सर्वच बेकायदा इमारती ई प्रभागात आहेत. बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २७ गाव ई प्रभागातून भारत पवार यांची बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.कल्याण पूर्व भागात हेमा मुंबरकर यांची ड, आय आणि जे प्रभागा व्यतिरिक्त अन्य प्रभागात बदली करण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
यापूर्वीचे वाद्ग्रस्त चंद्रकांत जगताप सारखे अधिकारी पुन्हा प्रशासनाने साहाय्यक आयुक्त पदी नेमल्याने बेकायदा बांधकामे प्रशासनलाा रोखायची आहेत की वाढवायची आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“अधीक्षक दर्जाचे अनेक कर्मचारी प्रशासनात आहेत. तरीही प्रशासन लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना साहाय्यक आयुक्त पदी नियुक्त करुन प्रभागातील कामकाजात स्वताहून अडथळे निर्माण करत आहे. नवनियुक्त साहाय्यक आयुक्त प्रभागात जाऊन प्रशासन गतिमान करण्यापेक्षा फेरीवाले, बेकायदा बांधकामांच्यात अडकून पडतात.” – श्रीनिवास घाणेकर, माहिती कार्यकर्ते ,कल्याण