ठाणे : करोना काळात रुग्ण उपचारासाठी उभारण्यात आलेल्या व्होल्टास रुग्णालयातील वैद्यकीय प्राणवायू वाहिनी प्रणाली, उपकरणे, फर्निचर असे साहित्य कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा रुग्णांना होणार असून या कामासाठी पालिकेने निविदा काढली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार वर्षांपूर्वी करोनाचा संसर्ग वाढला होता. रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असताना, त्या तुलनेत उपचारासाठी सुविधा पुरेशी नव्हती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने तात्पुरती रुग्णालये उभारण्यास सुरुवात केली होती. एक हजार खाटांच्या क्षमतेचे ग्लोबल रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यानंतर एक हजार खाटांचे पार्किंग प्लाझा रुग्णालय उभारण्यात आले होते. यानंतरही उपचारासाठी सुविधा अपुरी पडत असल्याचे लक्षात येताच पालिकेने व्होटल्टास कंपनीच्या जागेत, बुश कंपनी आणि बोरिवडे येथे तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालयाची उभारणी केली होती.
हेही वाचा – डोंबिवलीतील आयरे गावातील बुजविलेल्या तलावाची चौकशी
व्होल्टास येथे एक हजार खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला होता. महापालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालयांमध्ये पालिकेने प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारला होता. पार्किंग प्लाझा येथे ५ टन, ग्लोबल येथे ५ टन आणि व्होल्टास येथे ५ टन प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला होता. तसेच रुग्णालय परिसरात प्रत्येकी १२ टन क्षमतेची प्राणवायू टाकी उभारण्यात आली होती. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा संसर्ग ओसरला असून यामुळे रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. यामुळे करोना रुग्णालये ओस पडली आहेत. व्होल्टास कंपनीच्या जागेत शेड उभारून रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. हे रुग्णालय आता बंदावस्थेत आहे. या रुग्णालयाच्या जागेतून एक रस्ता प्रस्तावित आहे. त्यामुळे बंदावस्थेत असलेल्या रुग्णालयातील उपकरणे आता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार वैद्यकीय प्राणवायू वाहिनी प्रणाली, उपकरणे, फर्निचर असे साहित्य स्थलांतरित करण्यात येणार असून या कामासाठी १७ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेने निविदा काढल्याने रुग्णालय साहित्य स्थलांतर कामाला वेग आला आहे.