कल्याण – कल्याण पश्चिमेतील बारावे येथील माधव सृष्टी गृहसंकुल ते डाॅन बाॅस्को शाळेपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केेले जाणार आहे. या रस्तारूंदीकरणासाठी बारावे येथील स्वामी समर्थ मठ संस्थानकडून ४४ फुटाची जागा पालिकेला सामंजस्याने हस्तांतरित केली.बारावे येथे माधव सृष्टी गृहसंकुल भागात स्वामी समर्थांचा मठ आहे. अनेक वर्षापासून असलेल्या या मठाचा काही भाग रस्तारूंदीकरणाने बाधित होत होता. माधव सृष्टी संकुल ते डाॅन बाॅस्को शाळा रस्त्याचे अनेक रूंदीकरण झालेले नाही. वाढत्या वस्तीच्या तुलनेत या भागातील रस्त्यांचे रूंदीकरण आणि काँक्रीटीकरण न झाल्याने अनेक वेळा या भागात वाहतूक कोंडी होते.
बारावे भागातील नागरीकरणाचा विचार करून पालिकेने माधव सृष्टी संकुल ते डाॅन बाॅस्को शाळा ३० मीटर रूंदीच्या रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या रूंदीकरणात स्वामी समर्थ मठाची जागा बाधित होणार होती. मठाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत भुजबळ हे पालिकेचे निवृत्त अभियंता आहेत. पालिका ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, उपअभियंता संदीप तांंबे यांनी रस्तारूंदीकरणासाठी मठाची काही जागा बाधित होणार असल्याने ती जागा रस्ते कामासाठी देण्याचा प्रस्ताव मठ संस्थानसमोर ठेवला होता. सार्वजनिक हिताचे काम होत असल्याने मठाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता रूंदीकरणासाठी ४४ फुटाची जागा पालिकेला देण्याचा निर्णय घेतला. या जागा हस्तांतरणामुळे एका महत्वाच्या रस्त्यांचे रूंदीकरण मार्गी लागणार आहे.पालिकेच्या विकास आराखड्यातील हा रस्ता आहे. संस्थानच्या जागेचा मोठा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांसमोर होता. तो प्रश्न मार्गी लागल्याने पालिकेने तातडीने रस्ता रूंदीकरणात बाधित मठाची जागा मोकळी करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा >>>ठाण्यातील अंतर्गत रस्ते, पुलांची यंत्र वाहनाद्वारे होणार सफाई? चार यंत्र वाहने खरेदी करण्याचा पालिकेचा विचार
“ सार्वजनिक हिताचा विचार करून स्वामी समर्थ मठाने पालिकेला रस्ता रूंदीकरणासाठी विनाअट जागा देण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष अरूंद असलेला हा रस्ता प्रशस्त आणि काँक्रीटीकरणाचा होणार असल्याने परिसराला त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे मठ संस्थानने कोणताही अडथळा न आणता पालिकेला तातडीने जागा उपलब्ध करून दिली.”-प्रशांत भुजबळ, अध्यक्ष,स्वामी समर्थ मठ, बारावे, कल्याण.
“ महत्वाच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम मठाच्या जागेमुळे अडणार आहे. त्यामुळे मठाने पालिकेला रूंदीकरणासाठी बाधित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ती मठाने तात्काळ मान्य केली.”-राजेश सावंत,साहाय्यक आयुक्त,ब प्रभाग, डोंबिवली.
(कल्याणमधील बारावे येथील स्वामी समर्थ मठाचे रस्तारूंदीकरणात येणारे बांधकाम तोडण्यास सुरूवात.)