लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार ठाणे पोलीस दलातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या थेट जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या या नागपूर शहर पोलीस दलात करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील वागळे इस्टेट, श्रीनगर आणि कोपरी या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सामावेश आहे. विशेष म्हणजे, बदल्या झालेले काही पोलीस अधिकारी ठाणे शहरातील मोक्याच्या पोलीस ठाण्यात बदलीच्या प्रयत्नात होते अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-कल्याण : शाळांमधील खोटी पटसंख्या रोखण्यासाठी ‘पेन’चा आधार
लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसांत लागू शकतात. शहरात अनेक वर्ष काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा थेट तेथील पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींसोबत परिचय असतो. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी आयुक्तालय क्षेत्रातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले जातात. मंगळवारी राज्यातील १३० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी यासंदर्भाचे आदेश काढले आहे. बदल्यांमध्ये ठाणे पोलीस दलातील १७ अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. यातील बहुतांश अधिकाऱ्यांची नेमणूक नागपूर शहर पोलीस दलात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बदल्या झालेले काही पोलीस अधिकारी ठाणे शहरातील मोक्याच्या पोलीस ठाण्यात बदलीच्या प्रयत्नात होते अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
आणखी वाचा-बदलापुरकरांचे लोकलहाल वाढणार; उदवाहन, जिन्यांसाठी फलाट क्रमांक एक आणि दोन बंद होणार
बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील वागळे इस्टेट, श्रीनगर आणि कोपरी या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे मधुकर कड यांची नाशिक शहर तर श्रीनगर पोलीस ठाण्याचे किरणकुमार काबाडी आणि कोपरी पोलीस ठाण्याचे सुधाकर हुंबे यांची नागपुर शहर पोलीस दलात बदली झाली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, सचिन गावडे, अर्जुन गरड, अरूण क्षीरसागर, संतोष गायकर, विनोद कालेकर, गीताराम शेवाळे, ज्ञानेश्वर आव्हाड आणि दीप बने यांची नागपूर शहर पोलीस दलात बदल झाली आहे. तर मालोजी शिंदे आणि धनंजय करपे यांची पिंपरी चिंचवड, सुखदेव पाटील यांची अमरावती, सुनील शिंदे यांची नवी मुंबई आणि अतुल लांबे यांची गडचिरोली येथे बदली झाली आहे.