डोंबिवली : मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गेल्या महिन्यात टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनाला डोंबिवलीतील तिकीट संग्राहक रमेश पारखे (८२) दरवर्षीप्रमाणे या प्रदर्शनाला भेट आणि प्रदर्शनातील तिकीट खरेदीसाठी गेले होते. यावेळी तिकीट खरेदीसाठी पारखे ३२ क्रमांकाच्या तिकीट खिडकीवर गेले. तेथील टपाल कर्मचाऱ्याने पारखे यांना ‘तुम्ही माझ्याशी हिंदीतून बोला’, असे सांगितले. आपणास मराठी येत नाही का, असा प्रश्न पारखे यांनी करताच, संतप्त झालेल्या टपाल कर्मचाऱ्याने पारखे यांच्याशी अरेरावीची भाषा करून ‘तुम्ही माझी कोणाकडेही तक्रार करा, माझे कोणी काही करणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

घडल्या प्रकाराबद्दल ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष रमेश पारखे व्यथित झाले होते. मराठी भाषा बोलल्याने आपणास महाराष्ट्रात एवढी वाईट वागणूक देण्यात येत असेल तर संबंधित टपाल कर्मचाऱ्याला मराठी भाषेचे महत्व पटवून दिलेच पाहिजे, असा विचार करून टपाल तिकीट पाहणीनंतर रमेश पारखे डोंबिवलीतील घरी परतले. त्यांनी टपाल विभागाच्या संचालकांना पत्र लिहून ३२ क्रमांकाच्या खिडकीवर घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. ‘लोकसत्ता’ ऑनलाईनने (५ फेब्रुवारी) ही बातमी प्रसिध्द केली होती.

‘लोकसत्ता’मधील बातमीची दखल घेऊन दिवा येथे राहणारे मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी दिल्लीतील टपाल विभागाचे महानिदेशक यांना पत्र लिहून ‘लोकसत्ता’च्या बातमीचा संदर्भ देत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये रमेश पारखे यांच्याबाबतीत एका हिंदी भाषक कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाची तक्रार केली होती. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाने महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक आहे. ग्राहक संरक्षण अधिनियमात त्याच्या भाषेप्रमाणे त्याला सेवा मिळण्याचा अधिकार आहे. संविधानातील तरतुदीप्रमाणे हिंदी भाषेचा प्रचार केंद्र सरकार करू शकते. पण ते कोणत्याही नागरिकावर सक्ती करू शकत नाही, असे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी तक्रारीत म्हटले होते.

पाटील यांच्या तक्रारीची टपाल विभागाच्या दिल्ली कार्यालयाने घेतली. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई जनरल पोस्ट कार्यालयातील तिकीट संग्रहालय विभागाच्या प्रमुखांना दिले होते. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर ३२ क्रमांकावरील खिडकीवरील कर्मचाऱ्याला भाषेची अडचण होती. विषय भाषेच्या अडथळ्यामुळे उद्भवला होता. पारखे यांच्याशी कर्मचाऱ्याने कोणतेही गैरवर्तन केले नव्हते. पर्यवेक्षकाच्या मध्यस्थीने हा विषय मिटवण्यात आला होता. कर्मचारी हिंदी भाषक असल्याने हा प्रकार घडला. तरीही तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित टपाल साहाय्यक कर्मचाऱ्याची तिकीट संग्रहालय विभागातून अन्य विभागात बदली करण्यात आली आहे, असे मुंबई जनरल टपाल विभागातील तिकीट संग्रहालय विभागाचे उपनिदेशक राजन बुचडे यांनी उपाध्यक्ष आनंदा पाटील यांंना कळविले आहे.

Story img Loader