लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात मेट्रो स्थानकाच्या कामासाठी ठाणे पोलिसांनी आज, मंगळवारपासून वाहतुक बदल लागू केले आहेत. यानुसार मानपाडा ते तत्त्वज्ञान विद्यापीठ पर्यंत सेवा रस्त्यावर वाहतुकीस बंदी असणार आहे. यामुळे या वाहनांचा भार मुख्य आणि पर्यायी मार्गावर येऊन कोंडी वाढण्याची शक्यता आहे. १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतुक बदल लागू असतील, अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली.
घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या येथे ‘यु’ आकाराच्या तुळई उभारल्या जात आहेत. तसेच मानपाडा भागात स्थानक निर्माणाचे काम देखील सुरू आहे. मानपाडा भागात मुख्य रस्ता अरूंद आहे. तसेच येथून वाहतुक करणाऱ्या सेवा रस्त्यांवरही वाहनांचा भार असतो. स्थानक उभारणी कामादरम्यान कोणतीही दुर्घटना तसेच वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले आहेत. नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक शाखेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणाचीही हरकत किंवा सूचना नसल्यास पुढील आदेशापर्यंत हे वाहतुक बदल कायम करण्यात येतील असे पोलिसांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-ठाणे: पर्यावरणपूरक कंदीलांनी बाजारपेठा सजल्या, भारतीय बनावटीच्या कंदीलांना मागणी
असे आहेत वाहतूक बदल
- ठाण्याहून घोडबंदर सेवा रस्त्यावरून मानपाडा, मनोरमानगर, आर माॅलच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना विहंग हाॅटेल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ढोकाळी किंवा कापूरबावडी मार्गे वाहतुक करतील.
- घोडबंदरहून सेवा रस्ता येथून तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दोस्ती इम्पेरिया इमारतीजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खेवरा चौक, डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार मार्गे वाहतुक करतील.
- मानपाडा ते तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सेवा रस्ता आणि तत्त्वज्ञान विद्यापीठ ते मानपाडा सेवा रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई आहे.