ठाणे: येथील टेंभीनाका परिसरात नवरात्रौत्सवाकरीता ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूकीत मोठे बदल लागू केले आहे. याठिकाणी ठाणे तसेच आसपासच्या जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून ही कोंडी टाळण्यासाठी येथे वाहतूक बदल लागू करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत.
टेंभीनाका येथे जय अंबे माँ सार्वजनिक मंडळाकडून नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येते. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी येतात. तसेच ठाणे, मंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातूनही भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. यामुळे उत्सवाच्या काळात टेंभीनाका येथे नागरिकांची मोठी गर्दी होते. शिवाय, येथे जत्राही भरविण्यात येते. या काळात येथील रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होते. ही कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून येथे वाहतूक बदल लागू केले जात आहेत. यंदाही अशाचप्रकारे वाहतूक बदल लागू करण्यात आले असून तशी अधिसुचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी काढली आहे.
हेही वाचा… नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा; आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची अभियंत्यांना तंबी
या बदलानुसार ठाणे रेल्वे स्थानक येथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना टाॅवर नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गडकरी रंगायतन चौक, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गातून वाहतुक करतील. गडकरी चौक येथून टाॅवरनाका येथे जाणाऱ्या सर्व वाहनांना गडकरी चौक परिसरात बंदी असेल. येथील वाहने दगडी शाळा मार्गे वाहतुक करतील. चरई येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंभीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना धोबी आळी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबी आळी चौक, डाॅ. सोनुमिया रोड, धोबी आळी मशीद येथून वाहतुक करतील. कोर्टनाका चौक येथून आनंदाश्रम मार्गे टाॅवरनाका मार्गे वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जांभळी नाका, टाॅवरनाका मार्गे वाहतुक करतील. दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर मार्गे टेंभीनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्गे, अहिल्यादेवी बाग, धोबी आळी चौक, धोबी आळी मशीद मार्गे वाहतुक करतील. धोबी आळी चौक येथून दांडेकर ज्वेलर्स मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबी आळी चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबी आळी चौक, चरई, एलबीएस रोड मार्गे वाहतुक करतील.