लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या कल्याण ते दादर रेल्वे स्थानकापर्यंत प्रथम श्रेणी महिलांच्या डब्यातून फेरीवाले, मालवाहू महिला कामगार प्रवास करत आहेत. सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत आणि दुपारच्या वेळेत हे फेरीवाले प्रथम श्रेणी आणि सामान्य डब्यातून प्रवास करत असल्याने या फेरीवाल्यांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फेरीवाल्यांचा विषय वारंवार निदर्शनास आणुनही ते रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याने महिला प्रवासी तीव्र नाराज आहेत. भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाले यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असणे आवश्यक असते. पहाटेच्या वेळेत अनेक पालक महाविद्यालयात मुंबईत जाणाऱ्या आपल्या मुलांना सोडण्यासाठी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर येतात. त्यावेळी स्कायवाॅकवर भिकारी, गर्दुल्ले बसलेले, झोपलेले असतात. स्थानकावर एकही रेल्वे सुरक्षा बळाचा जवान तैनात नसतो, असे अनेक पालकांनी सांगितले.
हेही वाचा… ठाणे खाडी किनारी मार्गावर दोन ठिकाणी जंक्शन; बाळकुम आणि खारेगाव परिसर मार्गाला जोडणार
उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सातत्याने महिला, सामान्य डब्यातून फिरणाऱ्या फेरीवाल्यांविरुध्द रेल्वेच्या वरिष्टांकडे तक्रार केल्या आहेत. त्याचीही गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मध्य रेल्वेच्या बुधवारच्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्या सल्लागार समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या समोर अनेक सदस्यांनी फेरीवाल्यांचा विषय उपस्थित केला. त्यावेळी लालवानी यांनी रेल्वे स्थानकांवर एक हजार ९२५ सीसीटीव्ही, रेल्वे सुरक्षा बळ तैनात असते असे बैठकीत सांगितले.
हेही वाचा… सिलिंडर गळतीमुळे आगीचा भडका उडून दोन जण जखमी
एवढी यंत्रणा तैनात असुनही मग फेरीवाले डब्यात शिरतात कसे, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे स्थानकावर तैनात बहुतांशी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान मोबाईलमध्ये व्यस्त असतात. दिवसभरात महिलांच्या डब्यातून सुमारे पंधराशे फेरीवाले विविध वस्तू विक्रीचे निमित्त करुन व्यवसाय करत असल्याचा अंदाज अरगडे यांनी व्यक्त केला. काही गंभीर घटना घडल्यानंतरच रेल्वे प्रशासन या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे. बहुतांशी फेरीवाले परप्रांतीय आणि रेल्वे सुरक्षा बळाचे जवान परप्रांतीय आहेत. या नातेसंबंधांमुळे ते फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत, असे एका जाणकाराने सांगितले.
फेरीवाल्यांचा चकवा
फेरीवाले नोकरदार वर्गाप्रमाणे पाठीला पिशवी लावून लोकलमध्ये चढतात. त्यामध्ये त्यांचे वस्तू विक्रीचे सामान असते. हे सामान ते लोकल डब्यात चढल्यावर बाहेर काढतात. रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा जवानाच्या निदर्शनास आले तर तो त्या फेरीवाल्याला अडवतो. त्यामुळे फेरीवाले सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्यासाठी नोकरदार वर्गाप्रमाणे रेल्वे स्थानकात येऊन डब्यात चढल्यावर पाठीवरची पिशवी उघडून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर फेरीवाले आल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेला येत नाही, असे जाणकार प्रवाशाने सांगितले.