सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या मुंबई, ठाण्यातील रहिवाशांना आजूबाजूचे पक्षीही दिसेनासे झाल्याने ‘पक्षी दूर देशी जाती’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आसपास आढळणारे चिमणी, कावळा, कबुतर, पोपट आदी पक्षीही दुर्मीळ होत चालल्याने मोर, बुलबुल, दयाळ, सुतारपक्षी, घार आदी पक्षी तर आपल्यापासून कोसो दूर आहेत; परंतु पक्षिनिरीक्षणाची आवड असेल किंवा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल, तर पनवेलपासून काही किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबई, ठाण्यातील फिरस्ते सहज एका दिवसात या भागाची सफर करू शकतात.
मुंबईपासून सुमारे ६२ आणि पनवेलपासून अवघ्या १२ किमीवर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. मुंबई-गोवा महामार्गाला अगदी खेटून असलेल्या या अभयारण्याच्या दिशेने येत असताना कर्नाळा किल्ल्याचा आकाशाला भिडणारा सुळका दिसतो. पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात सुमारे १४० ते १५० प्रजातींचे विविध पक्षी आहेत. जगभरातून येथे आलेल्या आणि हंगामानुसार बदलत असलेल्या पक्ष्यांमुळे या अभयारण्यात सदैव किलबिलाट असतो. देशी पक्षी येथे आढळतातच, पण त्याशिवाय अनेक परदेशी पक्षीही आढळतात. ‘थ्री टोइंग किंगफिशर’ (बहुरंगी किंगफिशर), ‘मलबार ट्रोगॉन’, ‘अॅशी मिनिवेट’ आदी पक्षी तर येथील खास आकर्षण आहेत. येथे असलेल्या काही गोड गळय़ाच्या पक्ष्यांची शीळ ऐकताना एक स्वर्गीय आनंद मिळतो.
या अभयारण्यात पक्षिनिरीक्षणासाठी विविध मार्ग आहेत. त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे ‘हरियाल निसर्ग मार्ग’. एक किलोमीटर अंतरावरील या मार्गावरून जाताना विविधरंगी, विविध आकारांचे पक्षी आढळतात. काही मार्ग पाच ते सहा किलोमीटर अंतराचे असून ज्यांना अभयारण्यात मुक्त भटकंती करायची असेल आणि सखोल पक्षिनिरीक्षण करायचे असेल, तर हे मार्ग उत्तम आहेत.
सध्या पक्षिनिरीक्षणाचा छंद बराच लोकप्रिय होत चालला आहे. गळय़ात दुर्बीण अडकवून आणि सोबत कॅमेरा घेऊन जंगलात भटकंती करणारे बरेच जण आढळतात. कर्नाळा पक्षी अभयारण्य तर त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. एखाद्या देखण्या पक्ष्याचे चित्र कॅमेऱ्यात बंदिस्त करणे आणि एखाद्या पक्ष्याच्या गोड गाण्यात आपली तान मिळवणे हा छंद येथे येणारे पर्यटक जोपासतात. परिसरात पडलेली पक्ष्यांची रंगबेरंगी पिसे जमविणारेही अनेक जण आढळतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ हे गाणे हटकून आठवते.
पावसाळय़ात तर या अभयारण्याला हिरवा बहार येतो. डोंगरातून उगम पावणारे निर्झर, छोटे छोटे ओहोळ वाहत खाली येतात आणि जलपर्यटनाचा आनंद पर्यटकांना मिळवून देतात. पावसाळय़ानंतरच्या काळातही हे अभयारण्य तितकेच मोहक दिसते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ येथे फिरण्यासाठी उत्तम आहे.
कसे जाल?
* पनवेल स्थानकाजवळून कर्नाळा अभयारण्यात जाण्यासाठी बससेवा आणि रिक्षा, टमटम उपलब्ध आहेत.
* मुंबई सेंट्रल ते पनवेल अशी नियमित एसटीसेवा आहे. त्याशिवाय मुंबई, ठाणे, कल्याण येथून कोकणात जाणाऱ्या बस कर्नाळा अभयाण्याजवळ थांबतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा