डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मागील काही दिवसांपासून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुफान वाहतूक कोंडी होत आहे. या रोजच्या कोंडीने नोकरदार, स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. अर्धा ते एक तास या कोंडीत प्रवाशांना अडकून पडावे लागते, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. या रस्त्यावर आता वाहतूक कोंडीचे कारण नसताना जागोजागी वाहन कोंडी होत आहे. दहा मिनिटाच्या प्रवासाला अर्धा ते पाऊण तास लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. शिळफाटा रस्ता पिसवली टाटा नाका ते कल्याण फाट्यापर्यंत कोंडीत अडकला की लगतच्या गावांच्या हद्दीमधील पोहच रस्ते कोंडीत अडकतात. ग्रामस्थांना गावातील पोहच रस्त्यावरून बाहेर पडणे किंवा जाण्यासाठी रखडावे लागते.
हेही वाचा >>>Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
शिळफाटा रस्त्याचे काटई नाका ते पलावा चौक भागातील रुंदीकरण सोडले तर उर्वरित सर्व भागांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. या रखडलेल्या भागातील रहिवाशांचा मोबदल्याचा विषय शासन मार्गी लावण्यात शासन टाळाटाळ करत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. पलावा चौकातील उड्डाण पुलाचे काम राजकीय वाद आणि स्थानिकांच्या मक्तेदारीमुळे रखडले आहे.
संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मालवाहू अवजड वाहने या रस्त्यावर प्रतिबंध असताना धावतात. टाटा नाका ते सोनारपाडा, मानपाडा भागात मेट्रो रेल्वेची कामे शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका वाहनांना बसत आहे. शिळफाटा रस्त्यालगतच्या माळरानांवर, मोकळ्या जागांवर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या ठिकाणी येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात.
कल्याण फाटा येथे नियोजनावरील वाहतूक पोलीस ठाण्याकडून पनवेलकडे जाणारी मार्गिका खुली करतात. ही मार्गिका मोकळी झाली की मग नवी मुंबईकडून कल्याणकडे येणारी, कल्याणकडून नवी मुंबई, पनवेल, ठाण्याकडे जाणारी मार्गिका खुली करतात. वाहनांच्या अधिकच्या संख्येमुळे या एक एक मार्गिका खुल्या करताना वाहतूक पोलिसांना अर्धा ते पाऊण तास लागतो. या मार्गिका खुल्या होत असताना मुंब्रा, डायघर, नवी मुंबई आणि कल्याण फाटा दिशेने वाहनांच्या रांगा लागतात. दुचाकी स्वार या कोंडीत भर घालतात. शिळफाटा रस्त्यावरील या कोंडीमुळे या रस्त्यावरील काटई, निळजे रेल्वे मार्गावरील, रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील पूल उभारणीची कामे जलदगतीने शासनाने सुरू करावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
हेही वाचा >>>कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
वर्षाअखेर आली आहे. लोक वाहने घेऊन अधिक संख्येने बाहेर पडत आहेत. माॅलमधील गर्दीची या रस्त्यावर भर पडत आहे. शिळफाटा रस्त्यावर जागोजागी वाहतूक पोलीस तैनात असतात. वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्याचे प्रयत्न तातडीने केले जात आहे-सचिन सांडभोर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी वाहतूक विभाग.