कल्याण – कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात एका इसमाने आपली दुचाकी फलाटावर आणून प्रवास केल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. रेल्वे फलाटावर कोणत्याही प्रकारचे वाहन आणण्यास मज्जाव असताना संबंधित इसमाने वाहन केळवली रेल्वे स्थानकात आणले कसे, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात होते.
हेही वाचा >>> २५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन
शनिवारी सकाळच्या वेळेत ही घटना घडली आहे. केळवली रेल्वे स्थानक व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलिसांना हा दुचाकी स्वार फलाटावरून दुचाकी घेऊन जात असताना दिसला नाही का, असे प्रश्न प्रवाशांकडून केले जात आहेत.
केळवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी कमी असते. त्यामुळे संबंधित इसमाने थेट रेल्वे स्थानकात दुचाकी आणल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकातील फलाटावरून दुचाकी जात आहे. त्याला रोखण्याचे काम तेथील व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी का केले नाही, असे प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यात वाहनांमुळे चौकांमध्ये ध्वनी प्रदुषण; हवा प्रदुषण, तलावातील पाणी गुणवत्तेत सुधारणा
कल्याण जवळील आंबिवली रेल्वे स्थानकात एका रिक्षा चालकाने गेल्या वर्षी आपली रिक्षा रेल्वे स्थानकात आणली होती. त्याच्यावर रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी गुन्हा दाखल करून त्याला दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे केळवली रेल्वे स्थानकातील फलाटावर दुचाकी नेणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रवाशांची मागणी आहे. मिळालेली माहिती अशी की, संबंधित दुचाकी स्वार हा रेल्वे केबीनच्या दुरूस्तीचे काम या रेल्वे स्थानकात करत आहे. तो या कामाचा ठेकेदार आहे. त्या कामाच्या पाहणीसाठी तो थेट फलाटावर दुचाकी घेऊन आल्याचे समजते. रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले.