ठाणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार सातत्याने घडत असतानाच दुसरीकडे उन्हाळून पडलेल्या झाडाचे पुनर्रोपण करणे शक्य असतानाही त्याची निर्दयपणे कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने समाज माध्यमांद्वारे उघडकीस आणत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच घराजवळील झाड वाचवू शकलो नाही याची खंत ही त्याने व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिन्याभरात शंभरहून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. अशाच प्रकारे मराठी अभिनेता संतोष जुवेकर यांच्या ठाण्यातील घराबाहेर बाहेरील परिसरात विलायती चिंचेचा झाड उन्मळून पडले होते. हे झाड बहरलेले असल्यामुळे त्याचे पुनर्रोपण करणे शक्य होते. त्यासाठी संतोषने प्रयत्नही केला. मात्र काही वेळासाठी तो तिथून निघून गेला असता, पालिकेने ते झाड कापून टाकले. संतोष परत आल्यानंतर हा प्रकार पाहून अस्वस्थ झाला आणि त्याने याबाबत समाज माध्यमांवर संताप व्यक्त करत झाड वाचवू शकलो नाही याची खंत व्यक्त केली.
संतोष जुवेकरने व्यक्त केला संताप –
“ माझ्या बिल्डिंग बाहेर एक झाड उनमळून पडले होते. ते छान बहरलेले आणि जिवंत होते. या झाडाचे पुनर्रोपण केले तर ते जगेल, यासाठी मी प्रयत्न केले. विजू माने यांना फोन केल्यानंतर त्यांनी वृक्ष संवर्धनाचे काम करणारे रोहित जोशी यांचा नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. ते त्यांच्या टीमला घेऊन आले. मी सुद्धा बराच वेळ इथे उभा होतो. काही कामासाठी १० ते १५ मिनिट केवळ बाहेर गेलो, त्यावेळेस हे झाड कुणीतरी कापून टाकले. ही फार वाईट, विचित्र आणि घाणेरडी बाब आहे. मी झाड वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाचवू शकलो नाही, याची खंत व्यक्त करतो.”, असे संतोषने म्हटले आहे.
निसर्गाची काळजी घ्या तरच निसर्ग आपली काळजी करेल –
तसेच, “आपल्या घरात कुणी आजारी पडले किंवा अपघातात लुळापंगळा झाला तर आपण त्याला घराबाहेर काढतो का?, त्याची काळजी घेऊन बरे करतो ना?, तशीच निसर्गाची काळजी घ्या तरच निसर्ग आपली काळजी करेल. आपल्या घराजवळ कुठेही झाड उन्मळून पडले असेल आणि त्याचे पुनर्रोपण शक्य असेल तर ते जरुर करा.”, असेही त्याने म्हटले आहे.
पक्ष्यांसाठी झाड होते महत्वाचे –
“ठाणे महापालिकेने संपूर्ण शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ६० ते ७० टक्के झाडे ही विदेशी आहेत. याच प्रकारातील विलायती चिंचेचे झाड अभिनेता संतोष जुवेकर यांच्या घराबाहेरील परिसरात उन्मळून पडले होते. या झाडांचा पर्यावरणाला फारसा फायदा होत नाही. परंतु पक्षांच्या खाद्यासाठी हे झाड खूप महत्त्वाचे मानले जाते. शहरात पक्षांना नैसर्गिकरित्या खायला असे काही मिळत नाही. विलायती चिंचेच्या झाडावर खूप चिंचा येतात. ते पक्षांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व जातीचे पक्षी दिसून येतात. झाड मोठे होण्यासाठी २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे अशी झाड वाचवणे गरजेचे आहे. शहरात उमळून पडलेली ९० टक्के झाडे वाचविणे शक्य असून त्यासाठी आमच्या संस्थेला संपर्क साधा.” असे आवाहन पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी केले आहे.